करोना विषाणूचा फटका संपूर्ण जगभरातील क्रीडाविश्वालाही बसला आहे. बीसीसीआयनेही आयपीएलसह सर्व महत्वाच्या स्पर्धा रद्द केल्या आहेत. वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण आहे. याचसोबत काही खेळाडू व संघमालक प्रेक्षकांविना आयपीएल खेळण्यास तयार आहेत. परंतू बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने येत्या काळात भारतामध्ये क्रिकेट खेळवलं जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय.

“इतर देश आणि भारतामधली परिस्थिती खूप वेगळी आहे. येत्या काही काळात भारतामध्ये क्रिकेट खेळवलं जाणार नाही हे नक्की. सध्याच्या घडीला खूप जर-तर ची परिस्थिती आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांची आयुष्यं पणाला लागलेली असताना खेळाला अधिक महत्व देता कमा नये.” सौरव गांगुली टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता. जर्मनीतल Budesliga football tournament चे सामने प्रेक्षकांविना खेळवण्यास सुरुवात झाली आहे, यावरुन विचारलेल्या प्रश्नाला गांगुलीने उत्तर दिलं. २९ मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार होती.

देशभरात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने १५ एप्रिलपर्यंत ही स्पर्धा पुढे ढकलली. मात्र १५ एप्रिलपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आलेली नसल्यामुळे बीसीसीआयने पुढील सूचना मिळेपर्यंत आयपीएलचा तेरावा हंगाम स्थगित केला आहे. काही दिवसांपूर्वी माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी टी-२० विश्वचषक आणि आयपीएल भारतातच खेळवण्याची मागणी केली होती, परंतु सध्याच्या परिस्थितीत देशात क्रिकेट खेळवणं शक्य नसल्याचं गांगुलीने स्पष्ट केलं.