उदयोन्मुख फलंदाज श्रेयस अय्यरची नाराजी

बेंगळूरु : सातत्याने धावा करूनही वरिष्ठ राष्ट्रीय संघात निवड न झाल्यामुळे कामगिरीवर परिणाम होत आहे, अशा शब्दांत भारतीय अ संघांचा कर्णधार श्रेयस अय्यरने आपली नाराजी प्रकट केली आहे.

‘‘संयम राखणे हे अतिशय कठीण जात आहे. सातत्याने धावा करूनही राष्ट्रीय संघात न्याय मिळत नाही, हे मनाला सारखे सतावत असते. जेव्हा दर्जेदार गोलंदाजांचा सामना हातो, तेव्हा कामगिरीतही चढउतार होत असतात. मात्र या परिस्थितीत स्वत:वर लक्ष केंद्रित करीत कामगिरी होत नाही,’’ असे अय्यर या वेळी म्हणाला.

स्थानिक क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी करणाऱ्या अय्यरची मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी भारतीय संघात निवड झाली होती. फेब्रुवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो भारताकडून अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. गेल्या वर्षी अय्यरने भारत- अ संघाकडून खेळताना न्यूझीलंड- अ संघाविरुद्ध एकूण ३१७ धावा केल्या होत्या. १०८ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. तीन वर्षांपूर्वी स्थानिक क्रिकेटमधील कामगिरीच्या बळावरच त्याला दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून आयपीएल खेळण्याची संधी मिळाली होती. दोन हंगामांनंतर यंदा त्याच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आले होते.

कठीण परिस्थितीत संघाला सावरण्याची सर्वोत्तम संधी नेतृत्व तुम्हाला देते, हे अय्यरने आवर्जून सांगितले. तो म्हणाला, ‘‘कर्णधारपद सांभाळायला मला अतिशय आवडते. ही जबाबदारी जेव्हा माझ्याकडे असते, तेव्हा माझे व्यक्तिमत्त्व आणि दृष्टिकोन पूर्णत: बदलून जातो.’’

दक्षिण आफ्रिका- अ संघाविरुद्धच्या अनधिकृतत कसोटी मालिकेत भारतीय- अ संघाने सध्या १-० अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत अय्यर नेतृत्वाचा पुरेपूर आनंद लुटत असला तरी कुणीही कर्णधारपदाचा दुरुपयोग करू नये, असे त्याने प्रांजळपणे सांगितले.