३४ वर्षीय अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचने लाल मातीवर अप्रतिम कामगिरीचा नजराणा पेश करत यंदाच्या फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले. जोकोव्हिचने अंतिम सामन्यात ग्रीसच्या युवा स्टेफानोस त्सित्सिपासचे आव्हान मोडून काढत ६-७, २-६, ६-३, ६-२, ६-४ असा सामना खिशात टाकला. या विजयासह त्याने अनेक विक्रमही रचले.

जोकोव्हिचचा मोठा विक्रम

गेल्या वर्षी अंतिम सामना गमावल्यानंतर जोकोव्हिचने यंदा कोणतीही चूक केली नाही. त्याचे हे कारकिर्दीतील १९वे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. चारही ग्रँडस्लॅम जेतेपद दोनदा जिंकणारा तो तिसरा खेळाडू ठरला. याआधी रॉय इमरसन आणि रॉड लेवर यांनी १९६९मध्ये हा कारनामा केला होता. जोकोव्हिचने ९ वेळा ऑस्ट्रेलियन ओपन, ५ वेळा विम्बल्डन, ३ वेळा यूएस ओपन आणि आता २ वेळा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली आहे.

जोकोव्हिचचा हा २९वा ग्रँडस्लॅम अंतिम सामना होता. स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू जो रॉजर फेडररने ३१ ग्रँडस्लॅम अंतिम सामने खेळले आहेत. याआधी २०१६मध्ये जोकोव्हिचने अंतिम सामन्यात राफेल नदालला पराभूत करत पहिल्यांदा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती.

त्सित्सिपासची अयशस्वी झुंज

राफेल नदाल, रॉजर फेडरर याआधीच स्पर्धेबाहेर झाल्याने जोकोव्हिचसाठी फ्रेंच ओपनचा अंतिम सामना सोपा जाईल असेल वाटत होते, मात्र, युवा त्सित्सिपासने त्याला बरेच थकवले. तब्बल चार तासांपेक्षा जास्त वेळ चाललेल्या सामन्यात त्सित्सिपासने झुंजार कामगिरीचे प्रदर्शन केले. सुरुवातीचे दोन सेट मोठ्या फरकाने जिंकल्यानंतर त्सित्सिपासचा आत्मविश्वास दुणावला होता. मात्र, जोकोव्हिचने तिसरा सेटमध्ये आक्रमक खेळ करत ६-३ असा सेट जिंकला. त्यानंतर पुढच्या दोन सेटमध्ये त्सित्सिपासने चुका केल्या, ज्याचा फायदा जोकोव्हिचने उचलला. अंतिम सामन्यात त्सित्सिपासने पुनरागमनाचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला.