भारतीय ऑलिम्पिक महासंघावरील (आयओए) बंदी उठविण्यासाठी अनिवार्य असलेल्या घटनादुरुस्तीच्या कामास सुरुवात झाली असून आयओएची विशेष सर्वसाधारण सभा पुढील महिन्यात आयोजित केली जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) आयओएला १५ जुलैपूर्वी घटनादुरुस्ती करण्याची सूचना दिली आहे, तसेच एक सप्टेंबरपूर्वी आयओएच्या पुन्हा निवडणुका घेण्यासही सांगितले आहे. त्यानुसार आयओएचे अध्यक्ष अभयसिंग चौताला यांनी पुढील महिन्यात विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यास, तसेच निवडणूक प्रक्रियेस सुरुवात करण्याचे मान्य केले आहे. त्याचप्रमाणे आयओएशी संलग्न असलेल्या सर्व खेळांच्या राष्ट्रीय संघटना व राज्य ऑलिम्पिक संघटना यांनी आयओसीने दिलेल्या सूचनांनुसार घटनादुरुस्ती करण्यास सुरुवात केली आहे.
या संदर्भात आयओएमधील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, साधारणपणे १८ किंवा २५ ऑगस्ट रोजी आयओएच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. सर्व राज्य संघटना व विविध खेळांच्या राष्ट्रीय संघटनांना निवडणुकांबाबत सूचना करण्याचे कळविले असून येत्या दहा दिवसांत या सूचना मागविण्यात आल्या आहेत.