ऑकलंडमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी पाच सामन्यांच्या टी २० मालिकेतील अंतिम सामना झाला. या सामन्यात पुन्हा एकदा या दोन संघांमध्ये ‘सुपर ओव्हर’चा थरार रंगला. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक २०१९ च्या अंतिम सामन्यात या दोघांमध्ये सुपर ओव्हर झाली होती. त्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला होता. त्या पराभवाचा वचपा काढण्याची न्यूझीलंडकडे टी २० मालिकेतील अंतिम सामन्यात संधी होती, पण या सामन्यातही न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला.

पावसामुळे खोळंबा झालेल्या टी २० सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला आणि टी २० मालिका ३-२ अशी जिंकली. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना दोन्ही बाजूने ११ षटकांचा करण्यात आला होता. न्यूझीलंडने इंग्लंडला विजयासाठी ५ बाद १४६ धावांचे आव्हान दिले होते. यास प्रत्युत्तर देताना इंग्लंडनेही ७ बाद १४६ धावा केल्या. मूळ सामना अनिर्णित राहिला, त्यामुळे ‘सामना सुपर’ ओव्हरमध्ये गेला.

इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टॉ आणि कर्णधार इयॉन मॉर्गन यांनी ‘सुपर ओव्हर’मध्ये १७ धावा केल्या आणि न्यूझीलंडचा कर्णधार टीम सौदी याने गोलंदाजी केली. या आव्हानाचा पाठलाग करणे न्यूझीलंडला जमले नाही. मार्टिन गप्टिल, टीम सीफर्ट आणि कॉलिन डी ग्रँडहोम यांनी त्या षटकात केवळ ८ धावा केल्या आणि सामनाही गमावला.

गेल्या वेळी सामना सुपर ओव्हरमध्येही अनिर्णित राहिला होता. त्यानंतर अधिक चौकार-षटकारांच्या निकषावर इंग्लंडला विजयी घोषित केले होते. पण यावेळी इंग्लंडने सुपर ओव्हरमध्येच विजय मिळवला.