हॉकी इंडियाला पुढील ५ वर्षांसाठी नवीन प्रायोजकत्व मिळालं आहे. ओडीशा सरकारने पुढील ५ वर्षांसाठी हॉकी इंडियाचं प्रायोजकत्व स्विकारलं आहे. ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत झालेल्या एका सोहळ्यात याची घोषणा करण्यात आली. या सोहळ्याला भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघातले सर्व खेळाडू, आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा हजर होते. या सोहळ्यादरम्यान भारतीय संघाच्या नवीन जर्सीचंही अनावरण करण्यात आलं.

अवश्य वाचा – हॉकी विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ भारतात येणार

ओडीशा आणि हॉकी यांचं एक अतुट नात आहे. या राज्यातून अनेक खेळाडूंनी भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. आतापर्यंत अनेक गरजवंत आणि गुणी खेळाडूंना हॉकी इंडियाने आपला मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे या संस्थेशी जोडलं जाणं ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असल्याचं, पटनाईक म्हणाले. सध्याच्या भारतीय संघात बिरेंद्र लाक्रा, अमित रोहिदास, दिप्सन तिर्की, नमिती टोपो हे खेळाडू ओडीशाचेच आहेत. २०१८ साली होणारा हॉकी विश्वचषक हा ओडीशाची राजधानी भुवनेश्वर येथे पार पडला जाणार आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी भुवनेश्वर हे भारताची खेळांची राजधानी बनावी अशी इच्छा व्यक्त केली.