उत्तेजक चाचणीत दोषी सापडल्यामुळे कारवाई

नवी दिल्ली : उत्तेजक चाचणीत दोषी सापडलेला माजी आशियाई रौप्यपदक विजेता बॉक्सिंगपटू सुमित सांगवानवर राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेकडून (नाडा) एक वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे.

२०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सांगवान ९१ किलो वजनी गटात सहभागी झाला होता. ऑलिम्पिक पात्रता निवड चाचणी स्पर्धेसाठीसुद्धा त्याची निवड झाली होती. परंतु त्याच्या बंदीचा काळ त्वरित सुरू झाला आहे.

‘‘बंदी असलेल्या उत्तेजकांचे सेवन केल्यामुळे सुमितवर एक वर्षांची बंदी घालण्यात आली आहे,’’ असे ‘नाडा’चे महासंचालक नवीन अगरवाल यांनी सांगितले. स्पर्धा नसताना सांगवानचे उत्तेजक चाचणी नमुने घेण्यात आले. यात जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (वाडा) बंदी घातलेल्या अ‍ॅसेटॅझोलामाइड या उत्तेजकांचे अंश सापडले. त्यामुळे कलम १०.५.१ अनुसार त्याच्यावर एक वर्ष बंदी घालण्यात आली आहे.