टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे क्रीडाप्रेमींना वेध लागले आहेत. ही स्पर्धा २३ जुलै ते ८ ऑगस्टपर्यंत खेळली जाणार आहे. या स्पर्धेतील स्प्रिंट म्हणजेच वेगवान धावण्याच्या स्पर्धेत अमेरिकेचा बोलबाला असल्याचं दिसून येत आहे. अमेरिकेने या स्पर्धेत सर्वाधिक पदकं जिंकली आहेत. मात्र वैयक्तिक स्तरावर जमैकाच्या उसेन बोल्टचा विक्रम मोडणं कठीण आहे. उसेन बोल्टने ३ ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण ८ सुवर्ण पदकं पटकावली आहेत. दुसरीकडे वेगवान धावण्याच्या स्पर्धेत भारताला अद्याप एकही सुवर्ण पदक मिळालेलं नाही. अमेरिकेने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत १६ सुवर्ण पदकांसंह ३९ पदकं जिंकली आहेत. तर २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत १७ सुवर्ण पदकांसह ४६ पदकं जिंकली आहेत. ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत १९ सुवर्ण पदकांसह ३८ पदकं मिळवली आहेत. या विक्रमाजवळ कोणताही देश अद्याप तरी पोहोचू शकलेला नाही.

टोकिया ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताकडून महिला गटातून धावपटू दुती चंद आणि पुरुष गटातून धावपटू एमपी जाबिर हे पात्र ठरले आहेत. दुतीकडून १०० आणि २०० मीटर स्पर्धेत पदकाची अपेक्षा आहे. तर जाबिर ४०० मीटर हर्डल्स स्पर्धेत आपलं नशीब आजमावणार आहे. या व्यतिरिक्त पुरुष गट ४x४०० रिले स्पर्धेसाठी मोहम्मद याहिया, एन निर्मल टॉम, अमोज जॅकब आणि अरोकिया राजीव हे पात्र ठरले आहेत. तर मिश्र स्पर्धेसाठी ४x४०० रिले स्पर्धेसाठी मोहम्मद याहिया, जिस्ना मॅथ्यू, एन टॉम आणि विस्माया पात्र ठरले आहेत.

१९६० च्या रोम ऑलिम्पिक स्पर्धेत फ्लाइंग सिख मिल्खा हे चौथ्या स्थानावर पोहोचले होते. काही क्षणांच्या अंतराने त्यांचं पदक हुकलं होतं. १८ वर्षानंतर पीटी ऊषाने १९८४ मध्ये ऑलिम्पिक पदकाची आशा जागवली होती. लॉस एंजिलिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या ४०० मीटर हर्डल्स स्पर्धेत ती चौथ्या क्रमांकावर होती. ऑलिम्पिकमध्ये धावण्याची स्पर्धा सुरुवातीपासूनच आहे. १९०० सालच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताकडून पहिल्यांदा नार्मन पिचार्ड सहभागी झाला होता. त्याने २०० मीटर धावणे आणि २०० मीटर हर्डल्स स्पर्धेत दोन रजत पदकं पटकावली होते. इतिहासकार मात्र या पदकांना भारताचे असल्याची मान्यता देत नाही. कारण पिचार्ड हे ब्रिटिश वंशाचे होते. तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती ही पदकं भारताची असल्याची सांगत मोजणी करते.