पात्रता स्पर्धांपर्यंत पोहोचतानाच भारतीय स्पर्धकांची दमछाक

वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक देशांनी भारतामधून हवाईमार्गे येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे अनेक क्रीडा प्रकारांमधील भारताच्या ऑलिम्पिक पात्रतेला धक्का बसला आहे. सायना नेहवाल, किदम्बी श्रीकांत, हिमा दास, द्युती चंद या तारांकित क्रीडापटूंसह बॅडमिंटन, अ‍ॅथलेटिक्स, बॉक्सिंग, तिरंदाजी आणि तायक्वांदो या क्रीडा प्रकारांमध्ये भारत अद्याप आशावादी आहे.

मलेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा लांबणीवर पडल्याने सायना आणि श्रीकांत यांच्या ऑलिम्पिक पात्रतेचा प्रश्न बिकट झाला आहे. आता सिंगापूर खुली स्पर्धा ही अखेरची संधी त्यांच्यापुढे असेल. सिंगापूर स्पर्धासुद्धा लांबणीवर पडू शकते, परंतु १ ते ६ जून या कालावधीत ही स्पर्धा झाली तरी प्रवासाचे निर्बंध पेलून भारतीय खेळाडू या स्पर्धेस पोहोचू शकतील का, याबाबत साशंका आहे.

भारताच्या भरवशाच्या धावपटू हिमा आणि द्युती पोलंड येथे १ आणि २ मे रोजी झालेल्या ऑलिम्पिक पात्रतेच्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स रिले स्पर्धेला मुकल्या. अ‍ॅमस्टरडॅमला जाणारे विमान स्थगित केल्यामुळे भारताला कमी कालावधीत अन्य प्रवास व्यवस्था आखता आली नाही. याबाबत भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला म्हणाले की, ‘‘करोनामुळे उद्भवलेल्या सद्य:स्थितीमुळे भारतीय अ‍ॅथलेटिक्सपटूंना पात्रतेसाठी जागतिक स्पर्धांमध्ये सहभागी होणे कठीण आहे; परंतु जूनपर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे भारताला ऑलिम्पिक पात्रतेचे निकष गाठता येतील, अशी आशा आहे.’’

नवी दिल्लीत आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा झाली असती तर भारताचे आणखी काही खेळाडू ऑलिम्पिकला पात्र ठरले असते; परंतु करोना साथीमुळे ही स्पर्धा दुबईत हलवण्यात आली आहे. आता दुबईत स्पर्धा झाली आणि त्याला ऑलिम्पिक पात्रतेचा दर्जा मिळाला, तरच भारतीय खेळाडूंना आशा राखता येईल.

ऑलिम्पिक पात्रता तायक्वांडो स्पर्धा जॉर्डनमध्ये होणार असून, भारताच्या खेळाडूंना या स्पर्धेत पात्रतेच्या आशा आहेत. ‘‘करोनाच्या पार्श्वभूमीवर काही देशांनी हवाई सीमा बंद केल्यामुळे काही क्रीडा प्रकारांत भारताच्या ऑलिम्पिक पात्रतेपुढे आव्हान उभे ठाकले आहे. यासंदर्भात आम्ही आशियाई तायक्वांडो महासंघाची मदत मागितली आहे,’’ असे भारतीय तायक्वांडो संघटनेचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांनी सांगितले.

भारतीय खेळाडू विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होऊ शकले नाहीत; परंतु ही स्पर्धा ऑलिम्पिक पात्रता नव्हती. परंतु भारताला २१ ते २७ जून या कालावधीत पॅरिस (फ्रान्स) येथे होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रतेचा दर्जा लाभलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याबाबत आशा आहे. याबाबत भारतीय तिरंदाजी संघटनेचे सरचिटणीस प्रमोद चांदूरकर म्हणाले की, ‘‘फ्रान्सच्या विश्वचषक स्पर्धेद्वारे भारताच्या दोन महिला पात्र ठरल्या, तर सांघिक महिला गटातही सहभागी होता येऊ शकते. तूर्तास तरी फ्रान्समध्ये जाण्यासाठी कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाही. १० दिवसांच्या विलगीकरणाचा नियम असला तरी आम्ही या कालावधीत तंदुरुस्ती आणि सरावाची परवानगी मागितली आहे.’’

सायना, श्रीकांतच्या अडचणीत भर

नवी दिल्ली : करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ऑलिम्पिक पात्रतेच्या दर्जाची मलेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा (सुपर ७५०) लांबणीवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे सायना नेहवाल आणि किदम्बी श्रीकांत यांच्या ऑलिम्पिक पात्रतेचा मार्ग कठीण झाला आहे.

क्वालालम्पूर येथे २५ ते ३० मे या कालावधीत मलेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा होणार होती. या स्पर्धेच्या सुरक्षित आयोजनाच्या दृष्टीने संयोजकांनी आणि जागतिक बॅर्डंमटन महासंघाने सर्वतोपरी व्यवस्था केली होती. परंतु करोनाच्या ताज्या साथीमुळे स्पर्धा पुढे ढकलण्याशिवाय संयोजकांपुढे कोणताही पर्याय उरला नाही, असे जागतिक बॅडमिंटन महासंघाने म्हटले आहे. आता भारतीय बॅडमिंटनपटू सिंगापूरच्या स्पर्धेसाठी प्रयत्नशील आहेत.

अनेक देशांनी भारतामधील विमानांना बंदी घातल्यामुळे आता त्रयस्थ देशांत विलगीकरणाचा पर्याय आमच्यापुढे उपलब्ध आहे; परंतु ही जुळवाजुळव करून ऑलिम्पिक पात्रता मिळवणे मुळीच सोपे नाही. परंतु आम्ही भारताचे अधिकाधिक खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरावेत, यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील आहोत. – नामदेव शिरगावकर, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे संयुक्त सचिव