सौरभ चौधरी -अभिज्ञा पाटील जोडीला कांस्य; मनू-हीना अपयशी

जागतिक नेमबाजी स्पर्धा

चँगवॉन (द. कोरिया) : भारतीय नेमबाज ओमप्रकाश मिठारवालने आयएसएसएफ जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेच्या ५० मीटर पिस्तूल प्रकारात प्रथमच सुवर्णपदक जिंकण्याची किमया साधली. याचप्रमाणे कनिष्ठ गटात आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता सौरभ चौधरी आणि अभिज्ञा पाटील यांनी १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक गटात कांस्यपदक पटकावले.

भारताच्या खात्यावर मंगळवारी दोन पदकांची भर पडल्यामुळे याआधीची सर्वोत्तम कामगिरी मागे टाकली आहे. १२ वर्षांपूर्वी झाब्रेग येथे भारताने सहा पदके जिंकली होती.

काही महिन्यांपूर्वी २३ वर्षीय ओमप्रकाशने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या १० मीटर एअर पिस्तूल आणि ५० मीटर पिस्तूल प्रकारांमध्ये कांस्यपदके पटकावली होती. विश्व अजिंक्यपद स्पर्धेत त्याने ५६४ गुण मिळवून अव्वल स्थान मिळवले. सर्बियाच्या डॅमिर मिकेसने (५६२ गुण) रौप्य आणि कोरियाच्या डाइमयुंग ली याने (५६० गुण) कांस्यपदक पटकावले. २०१४च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक मिळवणाऱ्या जीतू रायने निराशा केली. ५५२ गुण मिळवणाऱ्या जीतूला १७वा क्रमांक मिळाला. सांघिक गटात मिठारवाल, राय आणि मनजीत (५३२) यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाला एकूण १६४८ गुण मिळाले आणि त्यांना पाचवा क्रमांक मिळाला.

ऑलिम्पिक प्रवेशाची आशा असलेल्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात मनू भाकर आणि आशियाई क्रीडा स्पर्धेमधील पदक विजेती हीना सिधू अपयशी ठरल्या. ५७४ गुणांसह मनूला १३वे आणि ५७१ गुणांसह हीनाला २९वे स्थान मिळाले. मनू, हीना आणि श्वेता सिंग (५६८ गुण) यांना एकूण १७१३ गुण मिळाले. त्यामुळे भारतीय संघाला चौथे स्थान मिळवता आले.

दिवसाच्या उत्तरार्धात सौरभ आणि अभिज्ञा ७६१ गुणांसह पाच संघांचा समावेश असलेल्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. भारताची आणखी एक जोडी देवांशी राणा आणि अनमोल जैन ७६५ गुणांसह पात्र ठरले होते; परंतु अंतिम फेरीत सौरभ-अभिज्ञा जोडीने ३२९.६ गुणांसह कांस्यपदक पटकावले, तर सुवर्ण आणि रौप्यपदकांवर यजमान दक्षिण कोरियाने वर्चस्व गाजवले.

२०२०च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी विश्व अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धा ही पहिली पात्रता स्पर्धा असेल; परंतु आगामी ऑलिम्पिकमधून ५० मीटर पिस्तूल प्रकार वगळण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाच्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतून १५ नेमबाजी प्रकारांमधील ६० स्थाने निश्चित होणार आहेत. सोमवारी अंजूम मुदगिल आणि अपूर्वी चंडेला यांनी महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात अनुक्रमे रौप्यपदक आणि चौथे स्थान मिळवून ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित केले. ऑलिम्पिकधील दोन स्थाने नक्की केली असली, तर भारतीय नेमबाजी संघटनेच्या नियमानुसार या स्थानांवर कोणी प्रतिनिधित्व करावे, हे निवड प्रक्रियेनंतरच ठरेल.