क्रिकेट या खेळाला भारतात एका धर्माचं स्वरुप आहे. सध्या करोनामुळे क्रिकेटच्या सर्व स्पर्धा रद्द झालेल्या असल्या तरीही क्रिकेटप्रेमी टीव्ही, सोशल मीडियावर जुन्या सामन्यांच्या व्हिडीओत स्वतःचं मन रमवताना दिसतात. सचिन रमेश तेंडुलकर हा समस्त भारतीयांसह जगभरातील क्रिकेट प्रेमींच्या गळ्यातला ताईत बनलेला आहे. आज सचिन वयाच्या ४७ व्या वर्षात पदार्पण करतोय. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता सचिनने यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या दिवशी आम्ही सचिनचे क्रिकेटमधले ४७ विक्रम तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

अवश्य वाचा – HBD Sachin : जेव्हा सचिनला भेटण्यासाठी अजिंक्य सकाळी त्याच्या घरी पोहचतो

१) कसोटी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या नावावर सर्वाधिक शतकं जमा आहेत. (५१ शतकं) २०१० साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरिअनच्या मैदानात सचिनने आपलं कसोटी क्रिकेटमधलं ५० वं शतक झळकावलं. क्रिकेटमध्ये शतकांचं अर्धशतक करणारा सचिन पहिला आणि आतापर्यंत एकमेव क्रिकेटपटू आहे.

२) कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही सचिन तेंडुलकरच्या नावे जमा आहे. २००८ साली सचिनने आपला समकालीन प्रतिस्पर्धी ब्रायन लाराला मागे टाकत हा विक्रम आपल्या नावे जमा केला होता.

३) कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १० हजार धावांचा टप्पा गाठण्याचा मान सचिन आणि लाराच्या नावे जमा आहे. दोन्ही खेळाडूंनी १९५ डावांमध्ये ही कामगिरी करुन दाखवली आहे.

४) आपल्या कारकिर्दीत सचिनने कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक देशाविरुद्ध शतक झळकावलं आहे.

५) सचिनने श्रीलंकेविरुद्ध आपला १६९ वा कसोटी सामना खेळत ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह वॉला मागे टाकलं होतं. या सामन्यानंतर सचिन कसोटी क्रिकेटमधला सर्वाधिक सामने खेळलेला खेळाडू ठरला होता.

६) कसोटीतील धावा – १५ हजार ९२१, वन-डे मधील धावा – १८ हजार ४२६…कसोटी, वन-डे आणि टी-२० या तिन्ही प्रकारात मिळून ३० हजारापेक्षा जास्त धावा करणारा सचिन हा जगातला एकमेव खेळाडू आहे.

७) कसोटीती ५१ शतकं आणि वन-डे मधील ४९ शतकं मिळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतकं झळकावणारा सचिन एकमेव खेळाडू आहे.

८) मार्च २०१२ मध्ये सचिनने आशिया चषकात बांगलादेशिवरुद्ध सामन्यात आपलं कारकिर्दीतलं १०० वं शतक झळकावलं होतं.

९) २०० कसोटी सामने आणि ४६३ वन-डे सामने खेळत सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे.

१०) आपल्या कारकिर्दीत भारतीय संघाच्या ७२ कसोटी विजय आणि २३४ वन-डे विजयांमध्ये सचिन खेळाडू म्हणून सहभागी होता.

११) कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा १५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रमही सचिनच्या नावे जमा आहे. ( २० वेळा )

१२) कसोटी क्रिकेटचा दर्जा असलेल्या प्रत्येक संघाविरोधात सचिनने सामनावीराचा पुरस्कार मिळवला आहे. UAE, नेदरलँड आणि बर्म्युडा या देशांविरोधात त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळवता आलेला नाही.

१३) आपल्या कारकिर्दीत सचिनने ६ वेळा एका कॅलेंडर वर्षात हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. (१९९७, १९९९, २००१, २००२, २००८, २०१०)

१४) आपल्या पहिल्या कसोटी शतकादरम्यान सचिनचं वय होतं, १७ वर्ष १९७ दिवस…भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा सचिन सर्वात तरुण खेळाडू आहे.

१५) कसोटी क्रिकेटमध्ये राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांनी २० वेळा शतकी भागीदारी रचल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये हा विक्रम आहे.

१६) सचिनने कसोटी क्रिकेटमधील ५१ शतकांपैकी २२ शतकं ही घरच्या मैदानावर तर २९ शतकं ही बाहेरच्या मैदानावर झळकावली गेली आहेत. यापैकी बाहेरील देशांत खेळताना झळकावलेली २९ शतकं हा विक्रम अजुनही सचिनच्या नावावर कायम आहे.

१७) सचिन तेंडुलकर वन-डे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा पहिला खेळाडू आहे.

१८) वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं (४९) आणि सर्वाधिकवेळा ५० पेक्षा जास्त धावा (१४५) हे विक्रमही सचिनच्या नावावर आहेत.

१९) १९९८ साली सचिनने एका कॅलेंडर वर्षात १८९४ धावा केल्या होत्या. आजही हा विक्रम मोडणं कोणालाही शक्य झालेलं नाही.

२०) एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक शतकं झळकावण्याचा विक्रमही सचिनच्या नावे जमा आहे. (१९९८ मध्ये ९ शतकं)

२१) एका प्रतिस्पर्धी संघाविरोधात सर्वाधिक शतकं झळकावण्याचा विक्रमही सचिनच्या नावे जमा आहे. सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मध्ये ९ शतकं झळकावली आहेत.

२२) वन-डे क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक चौकार लगावण्याचा विक्रम सचिनच्या नावे जमा आहे.

२३) आपल्या द्विशतकी खेळीच्या दरम्यान सचिनने आणखी एक विक्रम आपल्या नावे जमा केला. या खेळीत सचिनने २५ चौकार लगावले होते. एका वन-डे सामन्यात सर्वाधिक चौकार लगावण्याचा विक्रम सचिनच्या नावे जमा आहे. म्हणजे या खेळीतल्या शतकी धावा सचिनने केवळ चौकारांवर वसूल केल्या होत्या.

२४) सर्वाधिक वन-डे सामने खेळण्याचा विक्रमही सचिनच्या नावावर जमा आहे. (४६३ वन-डे सामने)

२५) सचिनच्या नावावर सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवणारा खेळाडू हा विक्रमही जमा आहे (६२ वेळा), यासोबतच विश्वचषक सामन्यांमध्ये सर्वाधिकवेळा सामनावीर शतक झळकावण्याचा विक्रमही सचिनच्या नावे जमा आहे (९ वेळा).

२६) सचिनच्या नावावर सर्वाधिकवेळा मालिकावीर पुरस्कार मिळवणारा खेळाडू हा विक्रमही जमा आहे, (१५ वेळा)

२७) कसोटी आणि वन-डे क्रिकेटमिळून सर्वाधिकवेळा सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कार मिळवणारा खेळाडू हा विक्रमही सचिनच्या नावे जमा आहे. ( ७६ वेळा सामनावीर आणि २० वेळा मालिकावीर)

२८) १९९० ते १९९८ या काळात सचिन भारतासाठी १८५ वन-डे सामने खेळला, हा विक्रम आहे.

२९) वन-डे क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात १ हजार पेक्षा जास्त धावा सचिनने ७ वेळा केल्या आहेत. (१९९४, १९९६, १९९७, १९९८, २०००, २००३, २००७)

३०) वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक भागीदारीचा विक्रम सचिन-द्रविड या जोडीच्या नावावर जमा होता. (३३१ विरुद्ध न्यूझीलंड, १९९९) मात्र २०१५ साली विंडीजच्या गेल आणि सॅम्युअल्स यांनी हा विक्रम मोडला.

३१) सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली ही जोडी वन-डे क्रिकेटमधली सलामीची सर्वोत्तम जोडी मानली जाते. दोघांनी मिळून २६ शतकी भागीदाऱ्या केल्या आहेत.

३२) सचिन आणि गांगुली या जोडीच्या नावावर ८ हजार २२७ धावा जमा आहेत. सलामीला येताना सचिन-सौरव जोडीच्या नावावर ६ हजार ६०९ धावा जमा आहेत. हे दोन्ही विक्रम आहेत.

३३) वन-डे क्रिकेटमध्ये सचिन ९० विविध स्टेडीयमवर खेळला आहे, आतापर्यंत अशी कामगिरी कोणालाच जमलेली नाही.

३४) श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया प्रतिस्पर्ध्यांविरोधात सचिनने अनुक्रमे ३११३ आणि ३०७७ धावा पटकावल्या आहेत. आतापर्यंत कोणत्याही खेळाडूला एका संघाविरोधात इतक्या धावा करणं जमलेलं नाही. ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी आणि वन-डे मिळून सचिनने ६७०७ धावा केल्या आहेत.

३५) २० वर्षांचा व्हायच्या आत सचिनच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ५ शतकं जमा होती.

३६) २०११ साली सचिनने आपला अखेरचा विश्वचषक खेळला. या स्पर्धेत सचिनच्या नावावर सर्वाधिक धावा जमा होत्या. (२२७८)

३७) विश्वचषक स्पर्धेत सचिनच्या नावावर सर्वाधिक शतकं आणि अर्धशतकांचा विक्रम जमा आहे.

३८) २००३ विश्वचषक स्पर्धेत सचिनने ६७३ धावा करत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला होता. या स्पर्धेत त्याने ७ अर्धशतकं झळकावली होती.

३९) सचिन तेंडुलकर आणि जावेद मियाँदाद यांनी सर्वाधिक विश्वचषक स्पर्धा खेळल्या आहेत. (६)

४०) वन-डे क्रिकेटमध्ये १५ हजाराहून अधिक धावा आणि १५० हून अधिक विकेट घेण्याचा विक्रम सचिनच्या नावावर जमा आहे.

४१) सचिनने आतापर्यंत आपल्या वन-डे कारकिर्दीत १८ वेळा ९० ते ९९ या धावसंख्येवर बाद झाला आहे.

४२) कसोटी क्रिकेटमध्येही सचिन १० वेळा ९० ते ९९ मध्ये बाद झाला आहे.

४३) लहानपणी आपल्या शारदाश्रम शाळेकडून खेळताना सचिनने नाबाद ३२६ धावा केल्या होत्या. आपला जिवलग मित्र विनोद कांबळीसोबत त्याची ६६४ धावांची भागीदारी गाजली होती.

४४) स्थानिक क्रिकेट खेळत असताना रणजी, दुलीप आणि इराणी करंडकात पहिल्याच सामन्यात शतक झळकावण्याचा विक्रम सचिनच्या नावे जमा आहे.

४५) १९९०-९१ सालाच सचिनने पहिल्यांदा यॉर्कशायर या काऊंटी संघाचं प्रतिनिधीत्व केलं होतं. अशी कामगिरी करणारा तो पहिला परदेशी खेळाडू ठरला होता.

४६) २०१४ साली सचिनला भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं. मानाचा पुरस्कार मिळवणारा सचिन एकमेव खेळाडू आहे.

४७) गोलंदाजीच्या निकषात बोलायला गेल्यास, एका षटकात ६ पेक्षा कमी धावा जिंकायला हव्या असताना सचिनने यशस्वीपणे भारताला सामना जिंकवून दिला आहे. अशी कामगिरी अद्याप कोणालाही जमलेली नाही.