टी-२० क्रिकेटमुळे क्रिकेटची परिभाषा बदलून गेली आहे. अवघ्या ३-४ तासात सामना संपत असल्यामुळे तरुण पिढीचा टी-२० क्रिकेटकडे ओढा जास्त असतो. मात्र आजही जगभरात कसोटी क्रिकेटचे अनेक चाहते मिळतील. सध्या कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघा चांगली कामगिरी करतोय. तब्बल १९ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी राहुल द्रविड आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण या जोडीने कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर विक्रमी भागीदारी रचत कांगारुंना पळता भुई थोडी केली होती.

पहिल्यांदा फलंदाजी करताना कर्णधार स्टिव्ह वॉ, मॅथ्यू हेडन आणि जस्टीन लँगर यांच्या धडाकेबाज खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने ४४५ धावांचा पल्ला गाठला. प्रत्युत्तरादाखल भारताची पहिल्या डावात घसरगुंडी उडाली. लक्ष्मणने झळकावलेल्या एकमेव अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात २१२ धावांपर्यंत मजल मारली. परिस्थितीचा अंदाज घेऊन ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह वॉने भारताला फॉलोऑन दिला.

दुसऱ्या डावात भारताने चांगली सुरुवात केली. चौथ्या दिवसाचा खेळ सुरु होण्यापूर्वी भारतीय संघाची परिस्थिती होती, २५४/४. यानंतर राहुल द्रविड आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण ही जोडी मैदानात उतरली. यानंतर दोन्ही भारतीय फलंदाजांनी कांगारुंच्या अक्षरशः नाकीनऊ आणले. मैदानावर पाय रोवत ३७६ धावांची अभेद्य भागीदारी रचताना द्रविड-लक्ष्मण जोडीने चौफेर फटकेबाजी केली. या दोन्ही फलंदाजांच्या कामगिरीमुळे भारताने चौथ्या दिवसाअखेरीस ४ गड्यांच्या मोबदल्यात ५८९ धावांपर्यंत मजल मारली होती. लक्ष्मण-द्रविड जोडीने रचलेला हा इतिहास आजही क्रिकेट प्रेमींच्या मनावर कोरला गेला आहे. स्वतः लक्ष्मणनेही आपल्या फेसबूक अकाऊंटवर या आठवणींना उजाळा दिला आहे.

दरम्यान भारतीय संघाने आपला दुसरा डाव ६५७/७ वर घोषित केला. लक्ष्मण २८१ धावांवर बाद झाला तर राहुल द्रविडने १८० धावा केल्या. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३८४ धावांचं आव्हान देण्यात आलं. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात चांगली सुरुवात केली खरी, मात्र हरभजन सिंहने आपल्या फिरकीच्या जाळ्यात कांगारुंना उडवत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. हरभजनने दुसऱ्या डावात ६ बळी घेतले.