शरीरसौष्ठव या खेळाला मुंबईत नव्हे, भारतात नव्हे तर जगभरात ग्लॅमर आहे. साध्या जिल्हास्तरीय स्पर्धेला चार ते पाच हजार प्रेक्षकांची गर्दी हमखास होते, पण तरीही हा खेळ अजूनही मागे पडला आहे तो खेळातील संघटकांच्या राजकारणांमुळे. मुंबई स्तरावर तीन आणि राष्ट्रीय स्तरावर दोन संघटना पाहायला मिळतात. यांच्यामधील राजकारण, हेवेदावे, दुसऱ्याची पाय खेचण्याची वृत्ती यामुळे खेळ आणि खेळाडूंचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होताना दिसते. एकत्र यायला हवे, असे सर्वच संघटक म्हणत असले तरी प्रत्यक्षात मात्र तसे होताना दिसत नाही. यामुळेच शरीरसौष्ठवपटूंच्या मनात नक्की कोणत्या संघटनेतून खेळावे हा संभ्रम आहे. त्याचबरोबर हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा होताना दिसत नाही. या साऱ्यांची झळ शरीरसौष्ठवपटूंना बसत असून खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी एकच संघटना असावी व त्यामध्ये सर्वानी सामील व्हावे, अशी इच्छा ‘दै. लोकसत्ता’कडे शरीरसौष्ठवपटूंनी व्यक्त केली आहे.
सर्व एकाच संघटनेत एकत्र आले, तर नक्कीच या खेळाची शक्ती बऱ्याच पटीने वाढेल. सध्याच्या घडीला या वेगवेगळ्या असोसिएशन्समुळे शरीरसौष्ठवपटूंचे नुकसान होत आहे. राष्ट्रीय किंवा राज्य पुरस्कार असो किंवा साधा प्रायोजक मिळवणे असो, शरीरसौष्ठवपटूंच्या हाती काहीही लागताना दिसत नाही. एखाद्या शरीरसौष्ठवपटूने त्यासाठी अर्ज केला तर अन्य संघटनेच्या व्यक्ती त्याच्या मार्गात अडथळा निर्माण करतात. गेले ८-१० वर्षे मी देशात नाव कमावले असून आता आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव मोठे करायचे आहे, पण या वादांमुळे कुठेतरी कामगिरीवर परिणाम होतो. सर्व संघटकांनी एकत्र बसून यावर तोडगा काढायला हवा, तरच या खेळाचे आणि खेळाडूंचे भले होऊ शकते.
– सुहास खामकर, आशिया-श्री आणि भारत-श्री
देशात आज पहिल्या क्रमांकाचा खेळ म्हणून क्रिकेट ओळखला जातो. कारण देशभरात त्यांची बीसीसीआय ही एकमेव संघटना आहे. क्रिकेटसारखाच शरीरसौष्ठव हा खेळही जनमानसात प्रसिद्ध आहे, पण या खेळाची प्रगती होताना दिसत नाही. त्यामुळे जर शरीरसौष्ठव या खेळाची एकच संघटना असली तर क्रिकेटसारखे दिवस या खेळालाही प्राप्त होतील. जर सर्व जण एकत्र आले तर स्पर्धा मोठी होईल, प्रायोजक अधिकाधिक मिळतील आणि शरीरसौष्ठवचा दर्जाही वाढेल. एकच संघटना असली तर खेळाडूंनाही त्याचे बरेच फायदे होतील.
– आशिष साखरकर, मि. वर्ल्ड स्पर्धेतील ७५ किलो गटातील कांस्यपदक विजेता
आम्ही खेळाडू आहोत, त्यामुळे असोसिएशनमधील वादामध्ये आम्ही काही बोलू शकत नाही, पण सर्व जण एकत्र आले तर नक्कीच खेळाची ताकद वाढेल. संघटकांबरोबर सर्व खेळाडू एका छताखाली एकत्र येतील आणि यामुळे खेळ आणि खेळाडूंची भरभराट होईल.
– सागर माळी, मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचा ‘मुंबई-श्री’
मी नेहमीच याबाबतीत आवाज उठवत आलो आहे. जोपर्यंत संघटक एकत्र येत नाही, एकच संघटना काम पाहात नाही तोपर्यंत खेळ पुढे जाऊ शकत नाही आणि त्याचबरोबर शरीरसौष्ठवपटूंचेही नुकसान होत आहे. सध्या शरीरसौष्ठवपटूंना नोकऱ्या मिळत आहे, पण स्पर्धेला जाण्यासाठी आम्हालाच सारा खर्च करावा लागतो. जर एकच संघटना असेल तर आम्ही सर्व खर्च करायला तयार आहोत, असे सांगितले आहे. त्याचबरोबर एकच संघटना असेल तर चांगली स्पर्धा पाहायला मिळेल, शरीरसौष्ठवपटूंना चांगले पारितोषिक मिळेल आणि त्यांना अन्य सोयी-सुविधाही मिळतील. त्यामुळे जोपर्यंत संघटक एका छत्राखाली येत नाही तोपर्यंत शरीरसौष्ठवपटू अस्वस्थ असतील.
– संग्राम चौगुले, मि. युनिव्हर्स
सर्व संघटक एकत्र येऊन एकच संघटना झाली तर नक्कीच शरीरसौष्ठव हा खेळ एका वेगळ्या उंचीवर जाईल. कोणत्या संघटनेमधून खेळायचे यावरून शरीरसौष्ठवपटू द्विधा मन:स्थितीत आहेत. एक संघटना झाली तर शरीरसौष्ठव खेळाचा स्तर वाढेल, चांगले शरीरसौष्ठवपटू पाहायला मिळतील, त्याचबरोबर बऱ्याच चांगल्या कंपन्या या खेळाकडे वळतील, त्यामुळे खेळाडूंना बक्षिसेही मोठय़ा रकमेची मिळतील. त्यामुळे शरीरसौष्ठवची एकच संघटना असायला हवी, तसे झाल्यास भारतात हा खेळ फार मोठा होऊ शकतो.
– प्रशांत साळुंखे, मुंबई शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेचा ‘मुंबई-श्री’
शरीरसौष्ठवाची एकच संघटना असेल तर या खेळाची ताकद अजूनच वाढेल. सध्याच्या घडीला तीन ‘मुंबई-श्री’ स्पर्धा झाल्या. यामुळे शरीरसौष्ठवपटूंना वेगवेगळे व्यासपीठ मिळत असले तरी त्यांना एकाच मंचावर एकत्र येता येत नाही. जर संघटना एकत्र झाली तर शरीरसौष्ठवपटूंना राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कार मिळवताना कोणतीही अडचण येणार नाही. त्याचबरोबर एकच स्पर्धा झाली तर पारितोषिकाची रक्कमही वाढेल आणि याचा फायदा शरीरसौष्ठवपटूंना होईल.
– सागर कातुर्डे, बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचा ‘मुंबई-श्री’
ताजा कलम
छोडो कल की बाते..
शरीरसौष्ठव म्हटले तरी बऱ्याच संघटना त्यांचे वाद-विवाद, राजकारण, आकस, हेवेदावे, पाय ओढण्याची आणि भलामण करण्याची वृत्ती हे चित्र पाहायला मिळते. शरीरसौष्ठव खेळाला चांगला प्रेक्षकवर्ग आहे, पण हा प्रेक्षक सध्या द्विधा मन:स्थितीत आहे. नेमकी कोणती संघटना मान्यताप्राप्त आहे हे त्यांच्यासाठी अनाकलनीय आहे. त्याचबरोबर यामध्ये शरीरसौष्ठवपटूंचीही होरपळ होताना दिसत आहे. सध्या राष्ट्रीय स्तरावर दोन संघटना कार्यरत आहेत. यामध्ये भारतीय शरीरसौष्ठव महासंघ यांना क्रीडा मंत्रालयाची मान्यता आहे, तर दुसरीकडे भारतीय शरीरसौष्ठव आणि तंदुरुस्ती संघटनेला आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव महासंघाची मान्यता आहे. क्रीडा मंत्रालयाने या संघटनांना विलीन न करता एका संघटनेला मान्यता दिली आहे. यावरून खेळाच्या विकासासाठी क्रीडा मंत्रालयाला एका खेळाच्या किती संघटना अपेक्षित आहेत. सर्वाना एकत्र न आणून त्यांनी शरीरसौष्ठवचा खेळ मांडला आहे. मुंबईतील तिन्ही संघटनेवर शिवसेनेचे वर्चस्व पाहायला मिळते, त्यामुळे त्यांच्यासाठी विलीनीकरण करणे सोपे आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असले असते तर त्यांनी हे सहजपणे केले असते, असे या क्षेत्रातील जाणकारांना वाटते. पण आता शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे या तिन्ही संघटनांमध्ये विलीनीकरण घडवण्याचे शिवधनुष्य पेलतील का? भारतात नव्हे तर जगभरात शरद पवार हे एक चांगले क्रीडा संघटक म्हणून परिचित आहेत, त्याचबरोबर त्यांच्या शब्दांना जबरदस्त वजनही आहे. त्यामुळे त्यांनी मध्यस्थी केली तर या संघटनांचे विलीनीकरण होऊ शकते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना ही फक्त निवडणुकांपुरती मर्यादित नाही, खेळातील वाद-विवादही सोडवू शकतो, हे दाखवून देण्याची त्यांच्याकडेही संधी असेल. दोन्ही राष्ट्रीय संघटनेवर महाराष्ट्रातील दोन मान्यवर व्यक्ती आहेत मोठय़ा पदावर आहेत, त्यामुळे जर या मंत्र्यांनी पुढाकार घेतला तर नक्कीच राष्ट्रीय स्तरावरही संघटनांचे मनोमीलन होऊ शकते.
खेळ आणि खेळाडूंचा विकास, हे फक्त सारे संघटनेतील मंडळी बोलून दाखवतात, पण या खेळाला खरेच पुढे न्यायचे असेल तर या घडीला सारे काही राग-लोभ विसरून एकत्र येण्यावाचून त्यांना पर्याय नाही. या संघटकांना जर खेळ आणि खेळाडूंची प्रगती करायची असेल, तर हे नक्कीच लवकर एकत्र येतील, अन्यथा ग्लॅमरस खेळ शापित होण्यावाचून राहणार नाही.