‘ब्लेड रनर’ या नावाने ओळखला जाणारा दक्षिण आफ्रिकेचा पॅरालिम्पिक धावपटू ऑस्कर पिस्टोरियस याला सुनावणीच्या अखेरच्या टप्प्यात मैत्रिणीचा खून केल्याप्रकरणी पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
बंदूक बाळगल्याप्रकरणी २७ वर्षीय पिस्टोरियसला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. अपंग धावपटू असलेल्या पिस्टोरियसला शिक्षा भोगताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल, हा दावा फेटाळताना प्रीटोरिया न्यायालयाच्या न्यायाधीश थोकोझाईल मासिपा यांनी शिक्षा सुनावताना योग्य व कडक शिक्षा, दहशत आणि त्याचे पुनर्वसन याबाबत समतोल साधला आहे. ‘‘गरीब आणि मागासवर्गीयांना एक न्याय आणि श्रीमंत तसेच प्रतिष्ठेच्या व्यक्तींना दुसरा न्याय दिला असता तर तो देशासाठी वाईट दिवस ठरला असता. पिस्टोरियसचे शारीरिक अपंगत्व लक्षात घेऊन त्याला योग्य शिक्षा सुनावण्यात आली आहे,’’ असे मासिपा म्हणाल्या.
पिस्टोरियसचा गुन्हा कितपत गंभीर होता, याबद्दल मापिसा म्हणाल्या, ‘‘या प्रकरणात पिस्टोरियसने निष्काळजीपणाचे टोक गाठले. शस्त्र बाळगणाऱ्या पिस्टोरियसने आपल्या बंदूकीतून एक गोळी नव्हे तर चार गोळ्या झाडल्या. छोटय़ाशा प्रसाधनकक्षातून कोणत्याही व्यक्तीला आपली सुटका करता आली नसती.’’
गेल्या वर्षी ‘व्हॅलेंटाइन डे’ला आपली मैत्रीण रीव्हा स्टिनकॅम्प हिचा गोळ्या झाडून खून केल्याप्रकरणी पिस्टोरियसला यापेक्षा अधिक शिक्षा होईल, असे चित्र होते. त्याला १० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा व्हावी, अशी मागणी अभियोग पक्षाने केली होती. बंद प्रसाधनगृहात स्टिनकॅम्पला गोळ्या झाडल्यानंतर आपण घरात चोर घुसल्यामुळे त्याच्यावर गोळ्या घातल्या होत्या, असा बनाव पिस्टोरियसने केला होता. २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सक्षम धावपटूंसोबत धावणाऱ्या पॅरालिम्पिकपटू पिस्टोरियसने इतिहास घडवला होता. त्यामुळे या सुनावणीकडे प्रसारमाध्यमांसहित संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. या शिक्षेमुळे मात्र पिस्टोरियसचे सर्व करार रद्द करण्यात आले असून त्याला कारकिर्दीलाही वादाचे गालबोट लाभले आहे.
तुरुंगवासादरम्यान पिस्टोरियसला धावता येणार नाही -संयोजक
बॉन : पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा भोगत असताना ऑस्कर पिस्टोरियसची लवकर मुक्तता करण्यात आली तरी त्याला पॅरालिम्पिकमध्ये धावण्याची परवानगी देण्यात येणार नाही, असे स्पर्धेच्या संयोजकांनी स्पष्ट केले. ‘‘तो पाच वर्षे आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी होऊ शकणार नाही. पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा संपेपर्यंत त्याचा विचार केला जाणार नाही. त्याने शिक्षेविरोधात न्यायालयात अपील केल्यानंतर त्याची शिक्षा कमी करण्यात आली तरच त्याचा रिओ डी जानिरो येथे २०१६मध्ये होणाऱ्या पुढील पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी विचार करण्यात येईल,’’ असे आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीचे प्रवक्ते क्रेग स्पेन्स यांनी सांगितले.