साईप्रणीतला कांस्यपदकावर समाधान

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला जागतिक सुवर्णपदकाचे स्वप्न साकार करण्याची संधी आहे. सिंधूने शनिवारी उपांत्य फेरीत चीनच्या चेन यू फेईचे आव्हान लीलया परतवून लावत जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत सलग तिसऱ्यांदा धडक मारली आहे. बी. साईप्रणीत याचा जपानच्या अव्वल मानांकित केंटो मोमोटाने फडशा पाडल्यामुळे त्याला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले.

गेल्या दोन स्पर्धामध्ये रौप्यपदकावर नाव कोरणाऱ्या सिंधूने सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या तसेच ऑल इंग्लंड विजेत्या चेन यू फेई हिचा ४० मिनिटे रंगलेल्या उपांत्य फेरीत २१-७, २१-१४ असा धुव्वा उडवत विजेतेपदाच्या दिशेने कूच केली आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या सिंधूला आता अंतिम फेरीच्या सामन्यात जपानच्या नोझोमी ओकुहारा हिचा सामना करावा लागणार आहे.

साईप्रणीतची विजयी घोडदौड जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या केंटो मोमोटाने १३-२१, ८-२१ अशी सहजपणे रोखली. सुरुवातीला आक्रमक खेळ करणाऱ्या साईप्रणीतला मोमोटाचा भक्कम बचाव भेदता आला नाही. मात्र उपांत्य फेरीत मजल मारून कांस्यपदकाची कमाई करण्यात साईप्रणीतला यश आले. भारताला ३६ वर्षांनंतर जागतिक स्पर्धेचे पदक मिळवून देणारा साईप्रणीत हा प्रकाश पदुकोण यांच्यानंतरचा पहिला पुरुष बॅडमिंटनपटू ठरला आहे.

चेन हिच्या प्रत्येक दुबळ्या फटक्यावर गुण वसूल करत सिंधूने सुरुवातीलाच ११-३ अशी भक्कम आघाडी घेतली होती. सिंधूच्या दमदार खेळापुढे चेनचा निभाव लागत नसल्यामुळे सिंधूची आघाडी वाढत चालली होती. त्यातच सिंधूने २०-६ अशी भलीमोठी आघाडी घेतल्यानंतर पहिला गेम सहजपणे जिंकला.

दुसऱ्या गेममध्ये चेनने सिंधूला कडवी लढत दिली. ३-३ अशा बरोबरीनंतर चेनचे फटके कोर्टबाहेर जात असल्यामुळे सिंधूला १०-६ अशी आघाडी घेता आली. चेनच्या बॅकहँडच्या कमकुवत बाजूचा सिंधूने पुरेपूर फायदा उचलला. गुण मिळत नसल्यामुळे चेनकडून बऱ्याच चुका होत होत्या. त्यामुळे सिंधूला १७-९ अशी आघाडी वाढवता आली. चेनने दोन मॅचपॉइंट वाचवले तरी तिचा एक जोरकस फटका कोर्टबाहेर गेल्यामुळे सिंधूला सहजपणे उपांत्य फेरीवर हुकमत गाजवता आली.

‘‘आता एक सामना शिल्लक असून या वेळी मी सुवर्णपदकाची कसर भरून काढण्याचा प्रयत्न करणार आहे. नोझोमी ओकुहारासमोर जिंकणे सोपे नसले तरी शांत, संयमी राहून खेळावर अधिक भर देत मला सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे,’’ असे सिंधूने सांगितले.

सुरुवातीपासूनच मी चेनच्या आव्हानासाठी सज्ज होतो. मोठी आघाडी घेतल्यानंतर मी मागे वळून पाहिले नाही आणि पहिला गेम आरामात जिंकला. दुसऱ्या गेममध्ये केलेल्या चुकांचा फटका मला बसला; पण आघाडीवर आल्यानंतर माझा आत्मविश्वास उंचावला आणि सामन्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवले.    – पी. व्ही. सिंधू