ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे रंगणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या बॅडमिंटन संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. ४ ते १५ एप्रिलदरम्यान होणाऱ्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाची मदार सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू आणि किदम्बी श्रीकांत यांसारख्या प्रमुख खेळाडूंच्या खांद्यावर असणार आहे.

अवश्य वाचा – सकारात्मक वृत्तीचे श्रेय सायना-सिंधूला!

“यंदा राष्ट्रकुल स्पर्धेत आपले खेळाडू चांगली कामगिरी करतीय याची मला संपूर्ण खात्री आहे. जागतिक क्रमवारीत आपले खेळाडू चांगल्या जागेवर आहेत, याचसोबत सिंधू, सायना आणि श्रीकांत यांसारख्या खेळाडूंनी अनेक महत्वाच्या स्पर्धांची विजेतेपद पटकावली आहेत. त्यामुळे यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू भारताला भरघोस पदकं मिळवून देतील.” भारतीय बॅडमिंटन महासंघाचे महासचिव अनुप नारंग यांनी संघनिवडीबद्दल आपली प्रतिक्रिया दिली.

साखळी फेरीत भारताचा समावेश अ गटात करण्यात आलेला असून भारतीय खेळाडूंसमोर पाकिस्तान, श्रीलंका, स्कॉटलंडच्या खेळाडूंचं आव्हान असणार आहे. त्यामुळे भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल होण्याची शक्यता जास्त असल्याचं म्हटलं जातंय. राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताचा बॅडमिंटन संघ पुढीलप्रमाणे असेल –

पुरुष संघ : किदम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय, चिराग शेट्टी, सत्विक साईराज, प्रणव जेरी चोप्रा

महिला संघ : पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, आश्विनी पोनाप्पा, सिकी रेड्डी, शिवानी गड्डे