दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने रोमहर्षक पद्धतीने 3 गड्यांनी विजय नोंदवला. शेवटच्या चेंडूवर एका धावेची गरज असताना फहीम अशरफने धाव घेत पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पाकिस्तानच्या बाबर आझमने या सामन्यात आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील 13वे शतक झळकावले आणि भारताच्या विराट कोहलीला मागे टाकले.

सर्वात वेगवान 13 शतके

पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज म्हणून ओळख कमावलेल्या बाबरने वनडेतील सर्वात वेगवान 13 शतके करण्याचा विक्रम रचला आहे. बाबरने 76व्या डावात ही कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेच्या हशिम अमलाने एकदिवसीय कारकीर्दीतील 13वे शतक 83 डावांमध्ये तर, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला इतकी शतके पूर्ण करण्यासाठी 86 डाव खेळावे लागले. आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने 86व्या डावात एकदिवसीय सामन्यात आपले 13 वे शतक ठोकले होते.

एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यातत 273 धावा केल्या. रसी व्हॅन डर डुसानने आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. 123 धावा करुन तो नाबाद राहिला. याव्यतिरिक्त डेव्हिड मिलरने अर्धशतक ठोकले. आफ्रिकेची धावसंख्या अडीचशेपार नेण्यात मिलरने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

 

प्रत्युत्तरात पाकिस्तानकडून इमाम-उल-हकने 70 धावा केल्या, तर कर्णधार बाबरने 103 धावा केल्या. शेवटी, शादाब खानने उपयुक्त 33 धावा करून पाकिस्तानला 3 गडी राखून विजय मिळवू दिला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने 52 चेंडूत 40 धावांचे योगदान दिले.