दुबई आणि अबुधाबी शहरात सध्या आशिया चषकाची धूम सुरु आहे. या स्पर्धेत गतविजेत्या भारतीय संघापुढे आपलं विजेतेपद कायम राखण्याचं आव्हान असणार आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माकडे भारतीय संघाचं नेतृत्व देण्यात आलेलं आहे. पाकिस्तानने हाँग काँगवर मात करुन स्पर्धेची मोठ्या धडाक्यात सुरुवात केली आहे. मात्र भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांच्या मते, पाकिस्तानच्या संघाला स्पर्धेचं विजेतेपद मिळवण्याची सगळ्यात जास्त संधी आहे. दुबई आणि अबुधाबीत खेळताना पाकिस्तानच्या संघाला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा होईल असंही मांजरेकर म्हणाले.

“माझ्यामते भारतापेक्षा पाकिस्तानला स्पर्धेत विजयाची संधी आहे. दुबई आणि अबुधाबीत पाकिस्तानचा संघ याआधी आपल्या घरच्या मैदानावरचे सामने खेळला आहे. त्यामुळे या मैदानातल्या खेळपट्ट्यांशी ते परिचीत आहेत. आशिया चषकासाठी समालोचनाच्या टीममध्ये सहभागी न झालेले मांजरेकर सध्या ESPN Cricinfo या संकेतस्थळावर तज्ञ म्हणून आपलं मत मांडत आहेत.”

भारतीय संघही यंदाच्या स्पर्धेत विजेतेपदाचा प्रमुख दावेदार आहे. मात्र परिस्थितीचा आढावा घेता पाकिस्तानला विजयाची संधी असल्याचं मांजरेकर म्हणाले. भारताचा आताचा संघ हा समतोल आहे. अनुभवी आणि तरुण खेळाडूंच्या सहभागामुळे हा संघ सर्वांवर भारी पडू शकतो. मात्र आगामी विश्वचषकाचा विचार केला असता, या स्पर्धेत तरुण खेळाडूंना संधी मिळणं गरजेचं असल्याचंही मांजरेकर यांनी स्पष्ट केलं. १९ तारखेला भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे, त्यामुळे या सामन्यात आता कोण बाजी मारतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – भारत-पाक सामन्यात कोहलीच्या अनुपस्थितीचा परिणाम होणार नाही- सौरव गांगुली