३० मे पासून इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये जोमाने सराव करतोय. १६ जूनरोजी सर्व क्रिकेटप्रेमींच्या नजरा असलेला भारत-पाक सामना रंगणार आहे. मध्यंतरी पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यामुळे भारत-पाक सामना होणार की नाही याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होण्याआधी इंग्लंडमध्ये सर्व संघांच्या कर्णधारांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.

अवश्य वाचा – कैफ-युवराज, जोडगोळीची इंग्लंडमध्ये अजुनही दहशत ! इंग्लंडच्या माजी कर्णधाराने केलं मान्य

या पत्रकार परिषदेत पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद आणि भारताचा कर्णधार विराट कोहलीही उपस्थित होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना आपल्या अनोखी इंग्रजी बोलण्यामुळे नेहमी ट्रोल व्हावं लागलं. पत्रकार परिषदेतही विराटला भारत-पाक सामन्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ज्यावर विराटने अस्खलित इंग्रजी बोलत आपली बाजू मांडली. मात्र पाकिस्तानचा कर्णधार सरफराजने इंग्रजीतून उत्तर देणं टाळण्यासाठी विराट जे बोलला तेच माझं उत्तर आहे असं म्हणत जास्त बोलणं टाळलं. सरफराजचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

दरम्यान पहिल्या सराव सामन्यात पाकिस्तानची सुरुवात खराब झाली आहे. अफगाणिस्तानच्या संघाने पाकिस्तानवर ३ गडी राखून मात केली. ५ जूनरोजी भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे. मात्र क्रिकेटप्रेमींना खऱ्या अर्थाने आस लागली आहे ती भारत-पाकिस्तान सामन्याची. त्यामुळे या सामन्यात विराट कोहलीचा संघ यशस्वी ठरतो का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – Cricket World Cup 2019 : पहिल्याच सराव सामन्यात पाकिस्तान पराभूत, अफगाणिस्तानचा विजय