पाकिस्तामध्ये सुरु असणाऱ्या दहशतवादी कारवाया आणि देशामधील असंतोषाचे वातावरण पाहता त्याचा फटका कला आणि क्रीडा क्षेत्राला बसल्याचं पाहायला मिळालं. पण, आता मात्र ही परिस्थिती बदण्याची चिन्हं असून, पाकिस्तानमध्ये क्रीडा विश्वात काही महत्त्वाचे बदल करत देशातच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. दहशतवादी हल्ल्याच्या ९ वर्षानंतर पहिल्यांदाच एक मोठा क्रिकेट संघ पाकमध्ये टी२० खेळणार आहे. येत्या काळात पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात एक टी२० मालिका खेळवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजीम सेठी यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधताना याविषयीची माहिती दिली. १, २ आणि ४ एप्रिलला हे सामने कराची येथे खेळवण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच हा कॅरेबियन संघ पाकिस्तानमध्ये जाणार होता. पण, परिस्थिती अचानक बिघडल्यामुळे या दौऱ्याची तारीख बदलण्यात आली. पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज दरम्यान होणाऱ्या या सामन्याच्या तारखांप्रमाणेच तो खेळवण्यात येणाऱ्या ठिकाणांमध्येही बदल करण्यात आले आहेत. सुरुवातीला हा सामना लाहोर येथे होणार होता, पण आता मात्र कराची येथे या सामन्याचा आनंद पाकिस्तानातील क्रीडारसिकांना घेता येणार आहे.

वाचा : अठराव्या वर्षीच तिने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ‘हा’ अनोखा विक्रम आपल्या नावावर नोंदवला

Pakistan and West Indies
पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज

दरम्यान, या दोन्ही संघांमधील क्रिकेट मालिकेला सुरुवात झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटविषयी सुरु असणाऱ्या संमिश्र चर्चांचं वादळ शमेल असा विश्वास नजीम सेठी यांनी व्यक्त केला. श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर तेथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी झालं होतं. कोणताही मोठा क्रिकेट संघ तेथे जाऊन मालिका खेळला नव्हता. पण, आता मात्र ही सर्व परिस्थिती सुधारण्याच्या दिशेनेच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पाऊलं उचलत आहे असंच म्हणावं लागेल.