नवी दिल्ली : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकाच वेळी भारताच्या ४० पेक्षा अधिक जवानांना आपले प्राण गमवावे लागल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. नवी दिल्लीत २० ते २८ फेब्रुवारीदरम्यान रंगणाऱ्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत मुहम्मद खलिल अख्तर आणि गुलाम मुस्तफा बशीर हे पाकिस्तानचे दोन नेमबाज आणि त्यांचे प्रशिक्षक राझी अहमद सहभागी होणार होते. पण या घटनेच्या पाश्र्वभूमीवर आता ते भारतात येणार नाहीत.

पाकिस्तानच्या नेमबाजांना व्हिसा मिळवण्यात विलंब होत असल्याचा कांगावा पाकिस्तान रायफल असोसिएशनने केला असला तरी त्यांना व्हिसा मंजूर करण्यात आला आहे, असे भारतीय रायफल असोसिएशनकडून (एनआरएआय) स्पष्ट करण्यात आले आहे. ‘‘पाकिस्तानच्या नेमबाजांना व्हिसा मंजूर करण्यात आल्याचे इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्ताने फोन करून आम्हाला कळवले आहे,’’ असे एनआरएआयचे महासचिव राजीव भाटिया यांनी सांगितले.

मात्र व्हिसाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, असे भारतीय उच्चायुक्ताकडून संध्याकाळी कळवण्यात आल्यानंतर पाकिस्तानी संघटनेने नाराजी व्यक्त करत एनआरएआयवर ताशेरे ओढले आहेत. ‘‘मंगळवापर्यंत आम्हाला कराचीत व्हिसा मिळू न शकल्याने आम्हाला बुधवारी नियोजित वेळापत्रकानुसार भारतात येता येणार नाही. भारतीय गृहमंत्रालयाची परवानगी असणारे पत्र तसेच गोळ्या आणि बंदुका घेऊन येण्यासाठी एनआरएआयच्या ना हरकत प्रमाणपत्रासह सर्व कागदपत्रे आम्ही १६ डिसेंबर रोजीच सादर केली होती. गेल्या काही दिवसांत नेमके काय घडले, हे आम्हाला माहीत नाही,’’ असे पाकिस्तानी रायफल असोसिएशनचे कार्यकारी उपाध्यक्ष जावेद लोधी यांनी पत्राद्वारे एनआरएआयला कळवले आहे.