दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडीवर असलेल्या पाकिस्तानची इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात खराब सुरुवात झालेली आहे. लीड्स कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या पाकिस्तानचा डाव इंग्लिश माऱ्यासमोर पुरता कोलमडला. जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस वोक्स यांनी पाकिस्तानच्या डावाला खिंडार पाडत सामन्यात इंग्लंडचं वर्चस्व निर्माण केलं. दुसऱ्या दिवसाअखेरीस पाकिस्तानच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना इंग्लंडने ३०२ धावांपर्यंत मजल मारलेली आहे. अद्याप इंग्लंडचे ३ फलंदाज शिल्लक असून त्यांच्याकडे दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस १२८ धावांची आघाडी आहे.

इंग्लंडच्या पहिल्या डावात सर्व फलंदाजांनी आपापल्यापरीने संघासाठी योगदान दिलं. अॅलिस्टर कूक आणि केटॉन जेनिंग्ज जोडीने पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. जेनिंग्ज माघारी परतल्यानंतर कूकने कर्णधार जो रुटसोबत संघाचा डाव सावरला. सतत रचल्या जाणाऱ्या अर्धशतकी भागीदारीमुळे इंग्लंडने पाकिस्तानचं आव्हान पार करत सामन्यात आघाडी घेतली. पहिल्या डावात इंग्लंडकडून डॉमनिक बेसने आतापर्यंत सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली आहे. पाकिस्तानकडून मोहम्म आमीर आणि फहीम अश्रफने प्रत्येकी २-२ बळी घेतले. त्यामुळे तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ आपल्या आघाडीत किती धावांची भर घालतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संक्षिप्त धावफलक – पाकिस्तान, पहिला डाव सर्वबाद १७४. विरुद्ध इंग्लंड पहिला डाव ३०२/७. डॉमनिक बेस ४९, अॅलिस्टर कूक ४६. फहीम अश्रफ २/४३, मोहम्मद आमीर २/६४