सलग ११ पराभवांची मालिका खंडित करण्याचा पाकिस्तानचा निर्धार

ट्रेंट ब्रिजचे मैदान हे फलंदाजांसाठी नंदनवन मानले जाते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये याच मैदानावर इंग्लंडने दोनदा विश्वविक्रमी धावसंख्या उभारल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडचा संघ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सोमवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाचशेचे विक्रमी शिखर सर करू शकेल, असा अंदाज क्रिकेटमधील जाणकारांकडून वर्तवण्यात येत आहे.

ओव्हलवर झालेल्या सलामीच्या सामन्यात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला १०४ धावांनी आरामात धूळ चारली होती. या विजयात जोफ्रा आर्चरने महत्त्वाची भूमिका बजावली होती. २०१५च्या विश्वचषकात इंग्लंडचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले होते. त्यातून सावरून मग इंग्लंडच्या संघाने जागतिक क्रमवारीत अग्रस्थानापर्यंत मजल मारली आहे. पाचशे धावसंख्येचा टप्पा हे एकदिवसीय क्रिकेटमधील आव्हानात्मक लक्ष्य असले तरी इंग्लंडचा संघ नाणेफेक जिंकल्यास प्रथम फलंदाजीच घेणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडने ८ बाद ३११ अशी धावसंख्या उभारली होती.

नॉटिंगहॅमला पाकिस्तानच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. वेस्ट इंडिजच्या वेगवान माऱ्यापुढे त्यांचा डाव १०५ धावांत कोसळला. पाकिस्तानने मागील सलग ११ एकदिवसीय सामन्यांत हार पत्करली आहे. यात इंग्लंडनेही एकदिवसीय मालिकेत त्यांना ४-० असे नमवले होते. त्यामुळे पराभवाची मालिका खंडित करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असेल.

वूडला संघात स्थान

इंग्लंडच्या संघाने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज मार्क वूडला संघात स्थान दिले आहे. आखूड टप्प्याच्या गोलंदाजीवर पाकिस्तानच्या फलंदाजांचा भंबेरी उडते, हेच लक्षात घेऊन त्याला संघात घेतले आहे. डाव्या पायाला झालेल्या दुखापतीतून सावरल्यानंतर वूडने यंदाच्या हंगामात आतापर्यंत जेमतेम १३.१ षटके गोलंदाजी केली आहे. परंतु आर्चरला साथ देण्याची क्षमता लक्षात घेता पाकिस्तानविरुद्ध ही जोखीम इंग्लंड पत्करणार आहे.

स्टोक्सवर इंग्लंडची भिस्त

आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात धावा, बळी आणि नेत्रदीपक झेल अशा अष्टपैलू कामगिरीसह बेन स्टोक्सने इंग्लिश क्रिकेटरसिकांचे लक्ष वेधून घेतले होते. स्टोक्सने ८९ धावांची अप्रतिम खेळी साकारली होती. याशिवाय ईऑन मॉर्गन, जेसन रॉय आणि जो रूट यांनी अर्धशतके झळकावली होती.

अख्तरचा पाकिस्तानला कानमंत्र

घाम, रक्त, ह्दयातील आग, आक्रमकता आणि बदमाशी या सगळ्यांचा पुरेपूर वापर करीत जिंकण्यासाठीच आपल्या देशासाठी खेळायचे असते, अशा शब्दांत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पाकिस्तानी संघाला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या स्वरुपाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

  • २०१७च्या चॅम्पियन्स करंडकानंतर घरच्या मैदानावर झालेल्या १८ पैकी फक्त एकाच सामन्यात इंग्लंडने पराभव पत्करला आहे. भारतानेच त्यांना २०१८मध्ये पराभूत केले होते.
  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३,०० धावांचा पल्ला गाठण्यासाठी जेसन रॉयला (२,९९२) अवघ्या आठ धावांची आवश्यकता आहे. पाकिस्तानविरुद्ध त्याने ही कामगिरी केल्यास इंग्लंडतर्फे सर्वात जलद ३,००० धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसरे स्थान मिळवेल.

इंग्लिश फलंदाजांना आमिरचा धोका

वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला गवसलेला सूर ही वेस्ट इंडिजविरुद्धच्या पराभवात पाकिस्तानसाठी आशेचा किरण ठरली. ६-०-२६-३ असे आमिरच्या गोलंदाजीचे भेदक पृथक्करण होते. १०६ धावांचे लक्ष्य पेलताना विंडीजचे तंबूत परतलेले तिन्ही फलंदाज हे आमिरनेच बाद केले होते. त्यामुळे इंग्लिश फलंदाजांना त्याच्यापासून सावध राहावे लागणार आहे. हसन अली आणि वहाब रियाझ यांची उत्तम साथ त्याला लाभू शकते.