विश्वचषक नेमबाजी स्पर्धा 

पुलवामा हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानी नेमबाजांना दिल्लीतील नेमबाजी विश्वचषक स्पर्धेसाठीचा व्हिसा नाकारण्यात आला आहे. त्यामुळे २०२०च्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या कोटय़ातील दोन जागा कमी करण्याची मागणी पाकिस्तानने केली आहे.

२५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल प्रकारातील दोन जागा कमी करण्यात याव्यात, असे पाकिस्तानने नमूद केले आहे. हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाल्याने पाकिस्तानच्या नेमबाजांना व्हिसा नाकारण्यात आला होता. जी.एम. बशीर आणि खलील अहमद हे पाकिस्तानचे नेमबाज या स्पर्धेत सहभागी होणार होते. मात्र त्यांना प्रवेशच मिळणार नसल्याने ज्या प्रकारात पाकिस्तानी नेमबाज सहभागी होणार होते, त्या दोन जागांचा कोटा दिल्लीतील विश्वचषक स्पर्धेतून कमी करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.  नेमबाजी महासंघाचे अध्यक्ष व्लादिमिर लिसिन आणि सरचिटणीस अलेक्झांडर रॅटनर हे या मुद्दय़ावर भारताचे क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांच्याशी चर्चा करणार आहेत.