इंग्लंडविरुद्धच्या तिसऱया कसोटीसाठी भारतीय संघात पुनरागमन केलेल्या पार्थिव पटेलच्या निवडीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी गुरूवारी पार्थिव पटेलच्या निवडीवर आपले मत व्यक्त केले. पार्थिव पटेलच्या फलंदाजी आणि यष्टीरक्षणाच्या कामगिरीत सातत्य राहिले आहे. पार्थिवची निवड त्याच्या अनुभव आणि यष्टीरक्षणाच्या गुणांवरून करण्यात आली आहे. अनुभवाला प्राधान्य देणे हे आम्हाला महत्त्वाचे वाटते, असे कुंबळे यावेळी म्हणाले.
येत्या शनिवारी मोहाली येथे भारतीय संघाचा इंग्लंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना रंगणार आहे. मोहाली कसोटीसाठी भारतीय संघाची बुधवारी घोषणा करण्यात आली. भारतीय संघात यावेळी वृद्धीमान साहाऐवजी पार्थिव पटेलची निवड करण्यात आली. पार्थिव पटेलच्या निवडीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. साहाच्या दुखापतीमुळे पार्थिव पटेलला मात्र अनपेक्षितपणे भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली आहे. यानिमित्ताने पार्थिव पटेल तब्बल आठ वर्षांनंतर कसोटी सामना खेळणार असून चार वर्षांनंतर तो पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणार आहे.
वाचा: इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात पार्थिव पटेलची वर्णी
पार्थिव पटेलच्या निवडीचे अनिल कुंबळे यांनी समर्थन केले. याशिवाय, बॉलला छेडछाड केल्याच्या विराट कोहलीवरील आरोपांवर देखील कुंबळे यांनी आपले मत व्यक्त केले. विराटच्या विरोधात कोणतेही कारण नसताना राईचा पर्वत करण्यात आल्याचे कुंबळे म्हणाले.
नुकतेच बॉलला छेडछाड केल्याप्रकरणी द.आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्युप्लेसिस देखील वादात सापडला होता. ड्युप्लेसिस दोषी असल्याचे आढळल्यानंतर त्याच्यावर कारवाई देखील करण्यात आली. ड्युप्लेसिसवर सामन्याचे मानधन दंड म्हणून आकारण्यात आले होते.
पार्थिव पटेल २००८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. तर २०१२ मध्ये पार्थिवने भारतीय संघाकडून शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. पार्थिव पटेल याने आतापर्यंतच्या कारकीर्दीत २० कसोटी सामने खेळले असून त्याने २९.६९ च्या सरासरीने ६८३ धावा केल्या आहेत. तत्पूर्वी मंगळवारी इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. या संघात वृद्धीमान साहाचा समावेश होता. सलामीवीर गौतम गंभीरला टीम इंडियातून वगळण्यात आले असून भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला संघात स्थान देण्यात आले आहे. इंग्लंड संघ सध्या भारताविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. दुस-या सामन्यात भारताने दिमाखदार विजय मिळवून मालिकेत १- ० ने आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ यापूर्वीच जाहीर करण्यात आला होता.