आशिया चषकाच्या यजमानपदावरुन बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या संस्थांमध्ये सुरु असलेल्या सुंदोपसुंदीने आता एक वेगळच वळण घेतलं आहे. भारताने पाकिस्तानात होणाऱ्या आशिया चषकात सहभागी होण्यास नकार दिल्यानंतर, पाकिस्तानचं यजमनापद काढून घेण्यात आलं. आशियाई क्रिकेट परिषद सध्या आशिया चषकासाठी वेगळ्या ठिकाणाचा विचार करत आहे. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वासिम खान यांनी भारतीय संघ आशिया चषकात सहभागी झाला नाही, तर पाकिस्तानही २०२१ साली भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात सहभागी होणार नाही.

खान यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया आल्या. पाकिस्तानी चाहत्यांमध्ये या वक्तव्यामुळे नाराजी पसरली होती. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत खान यांनी, पाकिस्तान भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात सहभागी न होण्याच्या वृत्ताचं खंडन केलं. “आम्हाला आमच्या खेळाडूंच्या सुरक्षेविषयी चिंता आहे. त्यामुळे स्पर्धेतून माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही. आशिया चषकाच्या यजमानपदावरुन मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला.”

“टी-२० विश्वचषक ही आयसीसीची स्पर्धा असते, त्यावर बहिष्कार टाकण्याचा प्रश्नच येत नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला फक्त खेळाडूंच्या सुरक्षेविषयी चिंता आहे. खेळाडूंसाठी व्हिसा आणि इतर गोष्टी जलद मिळणं हे देखील तितकच महत्वाचं आहे”, खान यांनी पीटीआयशी बोलताना आपली बाजू स्पष्ट केली.