इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट संघाला अपेक्षित कामगिरी बजावता आली नाही. परिणामी मिकी आर्थर यांना पाकिस्तान संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावरुन हटवण्यात आले आहे. मिकी आर्थर यांच्या बरोबरच गोलंदाजी प्रशिक्षक अजहर महमूद, फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर व ग्रँट लुडेन यांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

मिकी आर्थर यांची २०१६ साली पाकिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांच्या प्रशिक्षणाखाली पाकिस्तान संघाने आयसीसी चँपियन ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते. तसेच टी- २० क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाला पहिल्या क्रमांकावर नेलं होतं. मात्र, या दोन गोष्टी सोडल्या तर गेल्या चार वर्षात पाकिस्तान संघाला विशेष कोणतीही कामगिरी बजावता आली नाही. शिवाय कसोटी, एकदिवसीय व टी- २० या तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करु शकेल असा संघ तयार करण्यात ते अपयशी ठरले. अशा टीका त्यांच्यावर सातत्याने केल्या जात होत्या.

विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानला ९ पैकी केवळ ५ सामन्यांत विजय मिळवता आला होता. या स्पर्धेत त्यांनी केवळ ११ गुण मिळवले होते व रन रेटच्या आधारावर पाकिस्तानी संघ स्पर्धेतून बाहेर पडला. त्यानंतर मिकी आर्थर यांच्यावर होणारी टीका वाढत गेली. शेवटी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांचा कार्यकाल न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १५ ऑगस्टला त्यांचा पाकिस्तान प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ संपणार आहे.