विंडिजमध्ये भारतीय संघावर दहशतवादी हल्ला होणार असल्याची बातमी खोटी असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. दोन दिवसांपूर्वी भारतीय संघावर हल्ला होणार असल्याचा ईमेल पाकिस्तान बोर्डाला आल्याचे क्रीडा पत्रकार फैजान लखानी यांनी ट्विट केले होते. या वृत्ताचे बीसीसीआयने खंडन केले आहे.

बीसीसीआय, आयसीसी आणि विडिंज क्रिकेट बोर्डाने या सर्व अफवा असल्याचे म्हटले आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ आधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, ‘भारतीय संघाच्या धमकीची माहिती आम्ही तेथील सुरक्षा यंत्रणेला दिली होती. त्यांच्या पडताळणीमध्ये धमकी खोटी असल्याचे समोर आले.’

बीसीसीआयने या प्रकरणाची माहिती एंटीगुआ स्थित भारतीय उच्चायोगाला दिली आहे. भारतीय उच्चायोगाने ही माहिती विडिंज सरकारला दिली असून भारतीय संघाच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात आहे.

भारतीय संघाने एकदिवसीय आणि टी-२०मध्ये विडिंज संघाचा दारूण पराभव केला आहे. भारत आणि विडिंजमध्ये दोन कसोटी सामने होणार आहेत. सध्या भारतीय संघ विडिंज अ विरोधात सराव सामना खेळत आहे. सराव सामन्यात भारतीय संघाने पकड मिळवली आहे.