पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा स्पॉट फिक्सिंगमध्ये समावेश असल्याचा आरोप अल जझीरा या चॅनेलने केला होता. हे आरोप चुकीचे असून यात कोणतेही तथ्य नाही, असे स्पष्टीकरण पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (PCB) केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून या चॅनेलने शोधल्याचा दावा केला आहे. यावरून सध्या क्रिकेट वर्तुळात वादंग निर्माण झाला आहे.

‘या वाहिनीने केलेले सर्व आरोप हे तथ्यहीन आहेत. या आरोपांना जोड देणारा सबळ असा पुरावा अद्याप देण्यात आलेला नाही. जर ब्रॉडकास्टरने (वाहिनी) त्यांच्याकडे असलेले फुटेज सार्वजनिक केले किंवा आम्हाला दाखवले, तरच आम्हीच त्या आधारावर चौकशी करू, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले आहे.

या आधी इंग्लंडच्या तसेच ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनी स्पॉट फिक्सिंग केल्याचा आरोप इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) तसेच क्रिकेट ऑस्ट्रेलिया CA नेही फेटाळला आहे. योग्य तो पुरावा दिल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका ICCने घेतली आहे. मात्र, स्टिंग ऑपरेशनचे फूटेज देण्यास अल जझीराने नकार दिल्याचे वृत्त आहे. २०१० ते २०१२ दरम्यान खेळाडूंच्या एका गटानं स्पॉट फिक्सिंग केल्याचा आरोप आहे.

इंग्लंडच्या खेळाडूंबरोबरच ऑस्ट्रेलिया व पाकिस्तानच्या खेळाडूंच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप या वाहिनीकडून करण्यात आला आहे. पण या संबंधी देण्यात आलेली माहिती ही अत्यंत तुटपुंजी आहे. त्यात कुठल्याही प्रकारची स्पष्टता नाही, असे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने म्हंटले आहे. तसेच आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाकडे उपलब्ध गोष्टी देण्यात आल्या आहेत आणि त्यांच्यासमवेत यावर काम करण्यात येईल आणि खेळाचा मान राखण्यात येईल, असे ईसीबीनं म्हटलं आहे.