करोना विषाणू संसर्गाची आपत्तीजनक स्थिती असताना भारतीय खेळाडूंचा समावेश असणाऱ्या आणि कमी कालावधीच्या लघू स्वरूपाच्या इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) आयोजन करण्याची मागणी राजस्थान रॉयल्सचे कार्यकारी संचालक रणजित बारठाकूर यांनी के ली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अद्याप १३व्या ‘आयपीएल’च्या आयोजनाविषयीचा अंतिम निर्णय घेतलेला नाही. सद्यस्थितीत १५ एप्रिलपर्यंत ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र जगभरात करोनाच्या मृत्यूच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत असल्याने बीसीसीआयचे अधिकारी चिंतेत आहेत. ‘‘इंडियन प्रीमियर लीग असे या स्पर्धेचे नाव असल्याने ती यंदा भारतापुरती मर्यादित असावी. या स्पर्धेचा कालावधीही कमी असावा. सध्याच्या कठीण परिस्थितीत आश्वासक गोष्ट घडणे गरजेचे आहे. करोनाविषयीची स्थिती नियंत्रणात आल्यानंतर बीसीसीआय योग्य तो निर्णय घेईल, याची खात्री आहे,’’असे रणजित यांनी सांगितले.

सध्या देशात १४ एप्रिलपर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आली असून हा कालावधी त्यापुढे जाईल, अशी अपेक्षा व्यक्त के ली जात आहे. त्यामुळे बीसीसीआयने या वर्षअखेरीस आयपीएलसाठी वेळ द्यावा, त्यानुसार भारतीय संघाचे वेळापत्रक असावे, अशी इच्छा फ्रेंचायझी व्यक्त करत आहेत.

१५ एप्रिलपर्यंत यासंदर्भातील निर्णय होईल असे वाटत नाही. भारतीय खेळाडूंमध्ये गुणवत्तेची कमी नाही. यास्थितीत आयपीएलचे आयोजन सहज शक्य आहे. बीसीसीआय संघमालकांच्यादृष्टीनेही विचार करेल याची खात्री आहे,’’ असे रणजित यांनी सांगितले.

ते म्हणाले की, ‘‘याआधी फक्त भारतीय खेळाडूंचा समावेश असलेल्या आयपीएलचा आम्ही विचारही के ला नव्हता. पण आता त्यावाचून कोणताही पर्याय नाही. कारण परदेशी खेळाडूंकरिता केंद्र सरकारने प्रवासबंदी लागू के ली आहे. मात्र आयपीएल न होण्यापेक्षा ती भारतीय खेळाडूंसह खेळवलेली बरी. भारतीय खेळाडूंमध्येही अफाट गुणवत्ता आहे. १५ एप्रिलनंतर बीसीसीआय याबाबतीत निर्णय घेऊ शकते.’’