हाँगकाँगचा इरफान अहमदवरील मॅच-फिक्सिंगची कारवाई ही अन्य उदयोन्मुख संघांसाठी धोक्याचा इशारा आहे, असे हाँगकाँग क्रिकेट असोसिएशनचे मुख्य कार्यकारी टीम कटलर यांनी सांगितले.
२६ वर्षीय अहमदवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मॅच-फिक्सिंगचे आरोप ठेवले असून त्याच्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. जर त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले तर त्याला किमान दोन वर्षे बंदीची शिक्षा होऊ शकते.
‘‘फिक्सिंग हे क्रिकेटसाठी काळिमा असून जे देश कसोटी सामने खेळत नाहीत अशा देशांनी या भ्रष्टाचारापासून दूर राहावे. खेळाडूंनी सट्टेबाजांपासून दूर राहावे. जर कोणी खेळाडूंना लालुच दाखवत असेल तर अशा व्यक्तीबाबत लगेचच राष्ट्रीय संघटनेशी किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या भ्रष्टाचारविरोधी समितीकडे संपर्क साधावा. उदयोन्मुख देशांचे खेळाडू तीन वर्षांपूर्वी हौशी खेळाडू होते. त्यांना येण्याजाण्याचा प्रवासखर्च मिळत असे. आता खेळाडूंना मानधनही मिळत आहे,’’ असे कटलर यांनी सांगितले.
पाकिस्तानचा माजी खेळाडू नसीम गुलजार हा मॅच-फिक्सिंगमधील दलालाचे काम करतो व त्यानेच अहमद याच्याशी संपर्क साधला होता, असे वृत्त ऑस्ट्रेलियाच्या ‘फेअरफॅक्स मीडिया’ने दिले आहे. अहमदचे कायदेशीर सल्लागार केविन इगन यांनी आपला अशील निदरेष असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘‘गुलजार यांनी प्रलोभने दाखवली असली तरी अहमद याने ती स्वीकारलेली नाहीत.