सोमवारी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर राज्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० रद्द केलं. याचसोबत केंद्र सरकारने लडाख हा प्रदेश केंद्रशासित म्हणून घोषित केला आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत यासंदर्भातली घोषणा केली. केंद्रशासित प्रदेशांसाठी बीसीसीआयकडे वेगळ्या संघटनेची तरतूद नाहीये. त्यामुळे लडाखमधील खेळाडू रणजी क्रिकेटमध्ये जम्मू-काश्मीरकडून खेळू शकतात. बीसीसीआयच्या क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी यासंदर्भातली माहिती दिली.

”लडाखसाठी वेगळी राज्य क्रिकेट संघटना तयार करण्याचा विचार सध्या नाही. त्यामुळे या भागातील खेळाडू जम्मू-काश्मीर संघाचेच प्रतिनिधित्व करतील. त्यासाठी ते निवड चाचणीत सहभाग घेतील.” विनोद राय पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होते. जम्मू-काश्मीरच्या रणजी क्रिकेट संघात आतापर्यंत एकाही लडाख प्रांतातील खेळाडूला संधी मिळालेली नाहीये. डिसेंबर महिन्यापासून बीसीसीआयच्या रणजी करंड स्पर्धेला सुरुवात होणार आहे.