देशभरात सर्वत्र दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आयपीएलचा तेरावा हंगाम संपवून काही भारतीय खेळाडू मायदेशी परतले आहेत. तब्बल दीड महिन्यांपेक्षा जास्त काळ घराबाहेर असलेल्या भारतीय खेळाडूंनी आपल्या परिवारासोबत दिवाळी साजरी करण्यावर भर दिला आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या इतर सहकाऱ्यांसह ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला असून क्वारंटाइन काळात खेळाडूंनी सरावाला सुरुवातही केली आहे. २७ नोव्हेंबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार आहे.

विराटने थेट ऑस्ट्रेलियामधून आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण तुमच्या आयुष्यात आनंद, भरभराट आणि समाधान घेऊन येवो. लक्षात ठेवा फटके फोडू नका…निसर्गाचं संरक्षण करणं ही देखील आपली जबाबदारी असल्याचं विराटने म्हणटलं आहे. पाहा काय म्हणतोय विराट…

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे. विराट कोहली या दौऱ्यात पहिला कसोटी सामना संपल्यानंतर मायदेशी परतणार आहे. पत्नी अनुष्काची बाळंतपणात काळजी घेण्यासाठी विराटला बीसीसीआयने रजा मंजूर केली आहे.