भारतातील करोना रुग्णसंख्या वाढत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑलिम्पिकपात्र खेळाडूंना संपूर्ण सहकार्य देण्याचे आदेश दिले आहेत, असे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.

भारताचे विविध क्रीडा प्रकारांतील जवळपास १०० खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. तलवारबाजीमध्ये ऑलिम्पिक स्थान निश्चित करणारी भवानी देवी आणि अनुभवी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांनी सध्याच्या काळातही सातत्याने सहकार्य केल्यामुळे शासन आणि क्रीडा मंत्रालयाचे शुक्रवारी आभार मानले. त्या पाश्र्वभूमीवर रिजिजू यांनी मत व्यक्त केले. ‘देशातील स्थिती सध्या बिकट आहे. मात्र यामुळे ऑलिम्पिक पात्र खेळाडूंच्या सरावावर परिणाम होणार नाही, याची आम्ही काळजी घेत आहोत. पंतप्रधानांनी खेळाडूंच्या हिताच्या दृष्टीने सर्व ती आवश्यक पावले उचलण्यास परवानगी दिली आहे,’’ असे रिजिजू म्हणाले.

ऑलिम्पिकपात्र क्रीडापटूंचे लसीकरण

टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या क्रीडापटूंसह एकू ण १४८ जणांचे करोना लसीकरण करण्यात आली, अशी माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेने दिली. यापैकी १३१ जणांना पहिली मात्रा देण्यात आली, तर १७ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली, असे संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी सांगितले.