जागतिक बॅडमिंटन स्पर्धा

भारताचा प्रतिभावान बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयने मंगळवारी ‘बीडब्ल्यूएफ’ जागतिक खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत धक्कादायक विजयाची नोंद केली. चीनच्या दोन वेळच्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या लिन डॅनला पराभूत करून प्रणॉयने पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

एक तास व दोन मिनिटे रंगलेल्या सामन्यात भारताच्या बिगरमानांकित प्रणॉयने ११व्या मानांकित डॅनवर २१-११, १३-२१, २१-७ अशी तीन गेममध्ये सरशी साधली. उपांत्यपूर्व सामन्यात प्रणॉयपुढे जपानचा केंटो मोमोटा याचे आव्हान असेल.

जागतिक क्रमवारीत ३०व्या स्थानावर असलेल्या प्रणॉयने पहिल्या गेमपासूनच डॅनवर वर्चस्व गाजवले. या दोघांमध्ये झालेल्या पाच सामन्यांत आता प्रणॉयने तीन विजयांसह आघाडी घेतली आहे. यापूर्वी २०१८च्या इंडोनेशिया आणि २०१५च्या फ्रेंच बॅडमिंटन स्पर्धेत प्रणॉयने डॅनला नेस्तनाबूत केले होते. २००८ व २०१२च्या ऑलिम्पिक विजेत्या डॅनला तीन वर्षांनंतर प्रथमच जागतिक बॅडमिंटन स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठण्यात अपयश आले आहे. त्याशिवाय डॅनने कारकीर्दीत पाच वेळा जागतिक स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे.

अश्विनी-सिक्की यांना पुढे चाल

महिला दुहेरीत भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांना दुसऱ्या फेरीत चाल देण्यात आली. चायनीज तैपईचे प्रतिस्पर्धी चाँग चिंग हुई व याँग चिंग टुन यांनी माघार घेतल्यामुळे आता दुसऱ्या फेरीत भारतीय जोडीसमोर चीनच्या सातव्या मानांकित डु युए व लि यिन या जोडीचे आव्हान असेल.

साईप्रणीतची आगेकूच

जागतिक क्रमवारीत १९व्या स्थानावर असलेल्या भारताच्या बी. साईप्रणीतनेही उपउपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केले. साईप्रणीतने कोरियाच्या ली डाँगला फक्त ५६ मिनिटांत २१-१६, २१-१५ अशी सरळ दोन गेममध्ये धूळ चारली.

समीर पराभूत

भारताचा युवा बॅडमिंटनपटू समीर वर्माचे पुरुष एकेरीतील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. सिंगापूरच्या बिगरमानांकित लो कीनने १०व्या मानांकित समीरला २१-१५, १५-२१, २१-१० असे पराभूत केले.