विश्वनाथन आनंद आणि मॅग्नस कार्लसन यांच्यात या आठवडय़ापासून सुरू होणाऱ्या विश्वविजेतेपदाच्या लढतीकडे सर्वाच्या नजरा खिळल्या आहेत. मायदेशात आनंदला सहाव्यांदा विश्वविजेता होण्याचा मान पटकावण्याची संधी आहे. मात्र कार्लसनसारख्या तुल्यबळ प्रतिस्पध्र्यावर सरशी साधणे, हे आनंदसाठी सोपे आव्हान नक्कीच नाही. मात्र तरीही आनंद फॉर्मात असल्यास, तोच जगज्जेतेपदाचा मानकरी होईल, असे महाराष्ट्राचे पहिले ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांना वाटते. आनंद आणि कार्लसन यांच्यातील लढतीविषयी प्रवीण ठिपसे यांच्याशी केलेली बातचीत-
*आनंद आणि कार्लसन यांच्यातील लढतीविषयी काय सांगाल?
अभूतपूर्व अशी ही लढत रंगणार आहे. पण आताच या लढतीविषयी भाकीत करणे कठीण आहे. कार्लसनची शैली वेगळ्या धाटणीची आहे. प्रत्येक डाव जिंकण्यासाठीच तो खेळतो. पण डावातील स्थिती कुणाची चांगली आहे, याचा तो विचार करत नाही. फक्त प्रतिस्पध्र्याला हरवायचे, हाच त्याचा उद्देश असतो. पण आनंदची शैली त्याच्या विरुद्ध आहे. डावाच्या सुरुवातीलाच एक योजना आखायची आणि अखेपर्यंत त्या योजनेची अमलबजावणी करायची. प्रतिस्पध्र्याच्या चुकांचा फायदा हळूहळू उठवत त्यानंतर जोरदार आक्रमणे करायची, ही आनंदची रणनीती. पण कार्लसन समोरच्याला जिंकण्याची संधी फारच कमी वेळा देतो. त्यामुळे या लढतीविषयी जबरदस्त उत्सुकता लागून राहिली आहे.
*गेल्या वेळी बोरिस गेल्फंडने आनंदला चकवले होते, त्यामुळे या वेळेला आनंद अधिक तयारीनिशी उतरेल, असे वाटते का?
या वेळी आनंदची तयारी कशी झाली, हा अवघड प्रश्न मला त्याला विचारता आला नाही. पण गेल्या वेळी विश्वविजेतेपदाच्या लढतीनंतर मी अहमदाबादला आनंदला भेटलो होतो. त्यावेळी त्याने मला सांगितले की, १२ मुख्य डाव आणि चार ट्रायब्रेकर या १६ डावांमध्ये त्याने तयारी केलेली एकही डावाची स्थिती त्याला मिळाली नाही. गेल्फंड आपल्या आयुष्यात कधीही खेळला नसेल, अशी सुरुवात १६ डावांमध्ये करून त्याने आनंदला चकवले होते. पण कार्लसन डावाच्या सुरुवातीवर जास्त भर देत नाही. आनंदपेक्षा कार्लसनच्या खेळाचा दर्जा चांगला असल्यामुळे आनंद आपल्या खेळाचा दर्जा आणि तांत्रिक क्षमता वाढवण्यासाठी तयारीवर भर देईल, असे मला वाटते. म्हणूनच आनंदने आपल्या तयारीविषयी अधिक गुप्तता बाळगली आहे.
*आनंदला जेतेपदाच्या संधी कितपत आहेत?
आनंद चांगल्या फॉर्ममध्ये असल्यास, आनंदला विश्वविजेतेपदाची संधी अधिक आहे. एकदा आनंदला सूर गवसला की त्याला रोखणे कुणालाही जमत नाही. पण डाव ४० चालींच्या पुढे गेला तर कार्लसनच्या जेतेपदाच्या संधी ९० टक्क्य़ाने वाढतील. त्यामुळे ५५ टक्के कार्लसन विजेता ठरेल, असे मला वाटते. आनंदला ४५ टक्के विजयाची संधी आहे.
*विश्वविजेतेपदाची लढत भारतात होणार असल्याचा फायदा बुद्धिबळ चाहत्यांना कितपत होईल?
परदेशात जाऊन विश्वविजेतेपदाची लढत पाहणे कठीण आहे. त्यामुळे कमी खर्चात ही लढत पाहण्याची संधी भारतीय चाहत्यांना मिळणार आहे. या लढतीतील प्रत्येक डाव घरबसल्या पाहता येऊ शकतो. पण लढतीनंतर खेळाडूने दिलेली प्रतिक्रिया, त्यानंतर होणारी पत्रकार परिषद, लढतीदरम्यान विविध दिग्गजांशी केलेले विश्लेषण, याचा मोठा फायदा होतकरू बुद्धिबळपटूंना होऊ शकतो. बुद्धिबळामुळे बौद्धिक विकास व्हायला मदत होते. या लढतीमुळे अनेक जण बुद्धिबळाकडे वळतील, अशी आशा आहे. बुद्धिबळामुळे अधिकाधिक जण सांमजस्याने वागणारे निर्माण झाले, तरी विश्वविजेतेपदाच्या लढतीचे फार मोठे योगदान म्हणावे लागेल.