इंग्लिश प्रीमियर लीग (ईपीएल) १७ जूनपासून सुरू करण्याचे नियोजन सध्या करण्यात आले आहे. मात्र ‘ईपीएल’च्या मुख्य लढती आणि विजेतेपदाचे दावेदार असणाऱ्या लिव्हरपूलच्या काही लढती या त्रयस्थ ठिकाणी खेळवा, जेणेकरून मैदानावर चाहत्यांची गर्दी जमणार नाही, असे इंग्लंड पोलिसांनी सांगितले आहे.

प्रेक्षकांशिवाय ‘ईपीएल’ खेळवण्यात येणार असली तरी काही निवडक सामन्यांना प्रेक्षक मैदानाबाहेर गर्दी करण्याची शक्यता इंग्लंडच्या पोलिसांनी व्यक्त केली आहे. लिव्हरपूलच्या लढतींना मैदानाबाहेर त्यांच्या प्रेक्षकांकडून गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय मँचेस्टर सिटी विरुद्ध लिव्हरपूल, मँचेस्टर सिटी विरुद्ध न्यूकॅसल, मँचेस्टर युनायटेड विरुद्ध शेफिल्ड युनायटेड, न्यूकॅसल विरुद्ध लिव्हरपूल, एव्हर्टन विरुद्ध लिव्हरपूल या मुख्य लढती सुद्धा त्रयस्थ ठिकाणी खेळवण्याची मागणी पोलिसांनी केली आहे.

मर्यादित प्रेक्षकांना रशियन फुटबॉलसाठी प्रवेश

मॉस्को : रशियातील प्रीमियर लीग फुटबॉलचा उर्वरित हंगाम २१ जूनपासून सुरू होत असून मर्यादित प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येणार आहे. ‘‘सामन्याच्या वेळेस मैदानात १० टक्के प्रेक्षकांची उपस्थिती ठेवण्यास हरकत नाही. प्रेक्षकांना प्रवेश देतानाही त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पूर्णपणे खबरदारी घेण्यात येईल,’’ असे रशिया फुटबॉल संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले. रशियातील प्रीमियर लीग फुटबॉलच्या यंदाच्या हंगामातील आठ लढती अजून बाकी आहेत.