लॉकडाउन काळात ठप्प झालेलं क्रीडाविश्व पुन्हा एकदा हळुहळु जागेवर येत आहे. जर्मन सरकारने Bundesliga स्पर्धेला मान्यता दिली. यानंतर प्रेक्षकांव्यतिरीक्त या सामन्यांना सुरुवातही झाली. यानंतर स्पेन सरकारनेही ८ जून पासून La Liga स्पर्धेला मान्यता दिली. यानंतर फुटबॉलप्रेमींमध्ये मानाचं स्थान असलेल्या इंग्लिश प्रमिअर लिग स्पर्धेला १७ जून पासून पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. मँचेस्टर सिटी विरुद्ध आर्सेनल आणि अ‍ॅस्टन व्हिला विरुद्ध शेफील्ड युनायडेट हे संघ १७ तारखेला सामना खेळतील.

१३ मार्च रोजीचा सामना झाल्यानंतर प्रिमीअर लिग स्पर्धा करोना विषाणूमुळे स्थगित करण्यात आली होती. यानंतर सुमारे ३ महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा प्रिमीअर लिग स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत सर्व क्लबच्या अधिकाऱ्यांनी सरावाला सुरुवात करण्याला मान्यता दिली आहे. प्रिमीअर लिगशी संबंध असलेल्या २ हजापापेक्षा जास्त लोकांची करोना चाचणी घेण्यात आलेली असून आतापर्यंत १२ जणांचा अहवाल पॉजिटीव्ह आलेला आहे. स्पर्धा सुरु करण्यासाठी काही नियम आखण्यात आलेले आहेत.

प्रिमीअर लिगशी संबंधित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची दोन आठवड्यातून एकदा चाचणी घेतली जाणार आहे. स्पर्धेदरम्यान कोणत्याही खेळाडू अथवा कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं तर त्याने सात दिवस स्वतःला क्वारंटाइन करावं असा नियम घालून देण्यात आलेला आहे.