‘जेएलएन’ स्टेडियमवर रंगलेल्या रेल्वेच्या ७९व्या अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत कुमारावेल प्रेमकुमारने ८.०९मी. लांब उडी मारून राष्ट्रीय विक्रम केला आहे.
स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावण्याच्या निर्धाराने कुमारावेल प्रेमकुमार स्टेडियम उतरला. प्रेमकुमारने त्याच्या दुसऱया प्रयत्नात ७.९५मी. लांब उडी मारली आणि सुवर्णपदकाचा निर्धार पुर्णत्वास येण्यास मार्ग मोकळा झाला होता. पण, हा दिवस प्रेमकुमारसाठी वेगळेच क्षण घेऊन आला होता.
पाचव्या प्रयत्नात प्रेमकुमारने लांब उडी घेतली तेव्हा, आपण कापलेले अंतर पाहण्यासाठी प्रेमकुमार ‘स्कोअरबोर्ड’कडे बघु लागला. पण, यावेळेस स्कोअरबोर्डवर त्याने कापलेले अंतर येण्यासाठी वेग लागत होता. त्याने कापलेले अंतर ‘लेझर रेन्जफाइंडर’ने पंचांनी दोन वेळा तपासले. त्यानंतर पुन्हा मोजपट्टीच्या सहाय्याने तपासले आणि एका मिनिटानंतर स्कोअरबोर्डवर ८.०९ मी. आकडा झळकला. प्रेमकुमारच्या लक्षात आले ही माझी आतापर्यंतची सर्वोत्तम आणि राष्ट्रीय स्तरावरची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली आहे.
प्रेमकुमारच्या चेहऱयावर हास्य़ उमटले. उपस्थितांनी एकच जल्लोष केला. प्रेमकुमारचे अभिनंदन केले. कारण, नऊ वर्षानंतर प्रेमकुमारने लांब उडी स्पर्धेतील राष्ट्रीय विक्रम मोडला. याआधी २००४ साली अम्रतीपाल सिंगने ८.०८ मी.ची लांब उडी मारून राष्ट्रीय विक्रम केला होता.