ऑलिम्पिकमध्ये एके काळी भारतीय हॉकी संघाने सुवर्णयुग निर्माण केले होते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय संघापुढे ऑलिम्पिकसाठी पात्रता निकष पूर्ण करणे, हीच मोठी समस्या असते. पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी भारतीय संघाने पुरुष व महिला या दोन्ही विभागांत पात्रता निकष पूर्ण केले असल्यामुळे यंदाचे वर्ष त्यासाठी पायाभरणी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते.
भारतीय पुरुष संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकाबरोबरच ऑलिम्पिक पात्रता पूर्ण केली होती. महिला संघाला त्याकरिता काही महिने थांबावे लागले होते. त्यांची पात्रता निश्चित झाल्यामुळे या दोन्ही संघांना ऑलिम्पिकसाठी अधिकाधिक स्पर्धा व प्रदर्शनीय सामन्यांमध्ये संधी देण्यावर हॉकी इंडियाने भर दिला होता. जागतिक हॉकी लीगच्या अंतिम फेरी आयोजित करण्याचा मान भारताला मिळाला. उत्कृष्ट संयोजनाबरोबरच भारताने कांस्यपदक मिळवत कौतुकास्पद कामगिरी केली. भारतीय पुरुष व महिला या दोन्ही संघांनी परदेशातील सरावात्मक कसोटी सामन्यांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले.
जागतिक हॉकी लीगमधील कांस्यपदकाच्या लढतीत भारताने नेदरलँड्ससारख्या बलाढय़ संघावर मिळवलेला विजय भारतीय संघासाठी आत्मविश्वास उंचावणारा विजय होता. नेदरलँड्सने २०१३ मध्ये या स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते. साहजिकच त्यांच्यावर मात करणे हे भारतासाठी आव्हान होते. चुरशीच्या लढतीत भारताने त्यांना हरवले. याच लीगमध्ये भारताने बलाढय़ इंग्लंडवर केलेली मातही प्रशंसनीय होती.
अझलन शाह चषक स्पर्धेला हॉकी क्षेत्रात अतिशय मानाचे स्थान आहे. जगातील अव्वल दर्जाचे संघ तेथे सहभागी होत असतात. वरिष्ठ गटात भारताने कांस्यपदक मिळवले. या स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलियावर मात करीत सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला होता. कांस्यपदक हीदेखील भारतासाठी उल्लेखनीय कामगिरी आहे. कनिष्ठ गटासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या सुलतान ऑफ जोहर चषक स्पर्धेत भारताने उपविजेतेपदाची कमाई करीत आपल्या भावी यशाची झलक दाखवली आहे. अंतिम लढतीत त्यांनी इंग्लंड संघास चिवट लढत दिली, मात्र ३-४ अशा फरकाने भारताला हा सामना गमवावा लागला.
रिओ येथे पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिकमधील सामन्यांची कार्यक्रमपत्रिका निश्चित झाली असल्यामुळे त्या दृष्टीने भारतास सरावाकरिता नियोजन करता येणार आहे. साखळी गटात त्यांना जर्मनी, नेदरलँड्स, अर्जेटिना, आर्यलड व कॅनडा यांच्याशी खेळावे लागणार आहे. या संघांपैकी दोन संघांवर मात केली तरी भारताची उपांत्यपूर्व फेरी निश्चित होणार आहे. भारतीय संघासाठी ही सोपी परीक्षा असली तरी ऑलिम्पिक पदक मिळवण्यासाठी त्यांना खूप मोठी मजल मारावी लागणार आहे. यंदा त्या दृष्टीनेच भारतीय संघाकरिता परदेशात कसोटी सामने आयोजित करण्यात आले होते. या सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंनी चांगली शैली दाखवली.
महिलांकरिता ऑलिम्पिक प्रवेश ही सर्वोच्च आनंदाची गोष्ट आहे. बऱ्याच वर्षांनी भारताला ही संधी चालून आली आहे. यंदा भारतीय महिला संघाची कामगिरी अपेक्षेइतकी झालेली नाही. जागतिक हॉकी लीगमध्ये त्यांना पाचवे स्थान मिळाले, तर हॉवके बे चषक स्पर्धेत त्यांना सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. कनिष्ठ गटाच्या आशिया चषक स्पर्धेत भारताने चौथा क्रमांक पटकावला, हे लक्षात घेता ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांना खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत. भारतीय महिला संघासाठी पुन्हा नील हॉवगुड यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शन शैलीची कसोटीच असणार आहे. या कसोटीत उतरण्यासाठी त्यांना आतापासूनच कंबर कसून काम करावे लागणार आहे.
रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाला साखळी गटात अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, जपान व अमेरिका यांचे आव्हान आहे. बाद फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारतीय महिला संघाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे.
भारतीय पुरुष संघाचे प्रशिक्षक हा नेहमीच चर्चेचा विषय झालेला आहे. ‘वापरा व फेकून द्या’ असेच तत्त्व हॉकी संघटकांकडून वापरले गेले आहे. गेल्या २० वर्षांमध्ये एक डझनहून अधिक प्रशिक्षक झाले आहेत. आशियाई स्पर्धेत विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलणारे पॉल व्हॅन अ‍ॅस यांचे हॉकी इंडियाचे मुख्य नरेंद्र बात्रा यांच्याशी तीव्र मतभेद झाल्यानंतर त्यांची हकालपट्टी झाली. भारतीय हॉकीचे उच्च कामगिरी संचालक रोलँन्ट ओल्टमन्स यांच्याकडेच मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे देण्यात आली. भारतीय संघाला ऑलिम्पिदक पदक मिळवून देणे ही त्यांच्यासाठी सत्त्वपरीक्षा आहे.

मिलिंद ढमढेरे
millind.dhamdhere@
expressindia.com