विंडीजविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यात मुंबईच्या पृथ्वी शॉने पदार्पणात पहिले कसोटी शतक झळकावले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याला भारताच्या वरिष्ठ संघातून पदार्पण करण्याची संधी मिळाली आणि त्याने त्या संधीचे सोने केले. या शतकाबरोबर त्याने अनेक दिग्गजांना मागे टाकले. पण महत्वाचे म्हणजे याआधी देशांतर्गत स्पर्धांमध्ये प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या दुलीप आणि रणजी करंडक स्पर्धेतही त्याने पदार्पणातच्या सामन्यात शतक झळकावले होते. दुलिप, रणजी आणि कसोटी पदार्पणात शतक करणारा पृथ्वी हा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

पृथ्वीने २०१७ साली रणजी करंडक स्पर्धेत तामिळनाडूविरुद्धच्या सामन्यातून स्पर्धेत पदार्पण केले होते. हा सामना उपांत्य फेरीचा सामना होता. या सामन्यात पदार्पणातच त्याने शतकी खेळी साकारली होती. राजकोट येथे झालेल्या या सामन्यात त्याने मुंबईकडून खेळताना १२० धावा केल्या होत्या. पण दुसऱ्या डावात मात्र त्याला फारशी छाप पाडता आली नव्हती. त्यानंतर २०१७ मध्ये दुलीप चषक स्पर्धेतही त्याने पहिल्याच सामन्यात शतक झळकावले होते. या शतकासह त्याने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली होती.