लिंकोल्न (न्यूझीलंड)

न्यूझीलंडविरुद्धच्या अनुक्रमे एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेसाठी मुख्य भारतीय संघात निवड झाल्याचा आनंद मुंबईकर पृथ्वी शॉ आणि संजू सॅमसन यांनी बुधवारी दणक्यात साजरा केला. मोहम्मद सिराजच्या (३/३३) प्रभावी गोलंदाजीनंतर पृथ्वी (४८) आणि सॅमसन (३९) यांनी केलेल्या उपयुक्त फटकेबाजीच्या बळावर भारत ‘अ’ संघाने पहिल्या अनधिकृत एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंड ‘अ’ संघाला पाच गडी आणि १२३ चेंडू राखून धूळ चारली.

प्रथम फलंदाजी करताना रचिन रवींद्र (४९) आणि टॉम ब्रूस (४७) यांच्या योगदानानंतरही न्यूझीलंड ‘अ’ संघाचा डाव ४८.३ षटकांत २३० धावांत संपुष्टात आला. भारतातर्फे सिराजने तीन, तर खलिल अहमद आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर पृथ्वीने पाच चौकार आणि तीन षटकारांसह ३५ चेंडूंत ४८ धावा फटकावून भारताच्या विजयाचा पाया रचला. दुसऱ्या बाजूने पाचव्या क्रमांकावरील सॅमसनने २१ चेंडूंतच प्रत्येकी तीन चौकार-षटकारांच्या साहाय्याने ३९ धावा काढून भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला. त्यानंतर सूर्यकुमार यादवने १९ चेंडूंत ३५ धावा करून भारताला २९.३ षटकांतच विजयीरेषा ओलांडून दिली.

या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून दुसरा सामना शुक्रवारी खेळला जाणार आहे.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड ‘अ’ : ४८.३ षटकांत सर्व बाद २३० (रचिन रवींद्र ४९, टॉम ब्रूस ४७; मोहम्मद सिराज ३/३३) पराभूत वि. भारत ‘अ’ : २९.३ षटकांत ५ बाद २३१ (पृथ्वी शॉ ४८, संजू सॅमसन ३९; जेम्स नीशाम २/२५)