प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात तेलगू टायटन्सच्या संघाला अद्याप आपल्या पहिल्या विजयाची वाट पहावी लागणार आहे. मुंबईत उत्तर प्रदेशविरुद्ध झालेल्या सामन्यात तेलगू टायटन्सने अखेरच्या चढाईत एक गुण कमावत बाजी मारली होती, मात्र तेलगू टायटन्सच्या खेळाडूंनी पंचांची सामना संपल्याची शिट्टी वाजण्याच्या आधीच मैदानात येऊन सेलिब्रेशन केल्यामुळे, पंचांनी उत्तर प्रदेशच्या संघाला एक गुण बहाल केला. अखेरीस तेलगू टायटन्सला या सामन्यात २०-२० अशा बरोबरीत समाधान मानावं लागलं.

पहिल्या ४ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागलेल्या तेलगू टायटन्सने या सामन्यात चांगली सुरुवात केली. सूरज आणि सिद्धार्थ देसाई यांनी चढाईत आक्रमक खेळी करत, चांगले गुण कमावले. सिद्धार्थ आणि सूरज आजच्या सामन्यात अधिक सफाईने खेळत होते. सुरुवातीच्या काही मिनीटांमध्ये सिद्धार्थ देसाईने केवळ बोनस पॉईंट घेण्याकडे आपला भर दिला. सूरज देसाईनेही त्याला चांगली साथ दिली. देसाई बंधूंच्या आक्रमक खेळामुळे तेलगू टायटन्सने सामन्यात आघाडी घेतली.

मात्र तेलगू टायटन्सच्या बचावफळीला आपल्या चढाईपटूंच्या तोडीचा खेळ करता आला नाही. याचा फायदा घेत उत्तर प्रदेशच्या श्रीकांत जाधव, मोनू गोयत यांनी चढाईमध्ये झटपट गुण कमावत सामन्यात पुनरागमन केलं. महत्वाची गोष्ट म्हणजे उत्तर प्रदेशच्या बचावफळीने पहिल्या सत्राच्या उत्तरार्धात चांगला खेळ करत संघाला बरोबरी साधून देण्यात महत्वाचा वाटा उचलला. नितेश कुमार, अमित यांनी चांगल्या पकडी केल्या, मध्यांतरापर्यंत दोन्ही संघ ११-११ अशा बरोबरीत होते.

दुसऱ्या सत्रामध्येही दोन्ही संघ सुरुवातीला सांभाळून खेळ करत होते. कोणत्याही संघाला मोठी आघाडी घेण्याची संधी मिळत नव्हती. अखेरीस तेलगू टायटन्सकडून सिद्धार्थ देसाईने ही कोंडी फोडत पुन्हा एकदा चढाईत काही गुणांची कमाई करत संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र मोक्याच्या क्षणी उत्तर प्रदेशच्या बचावपटूंनी सिद्धार्थ देसाईची पकड करत सामन्यात पुन्हा एकदा पुनरागमन केलं. सामना संपायला अखेरचा एक मिनीट बाकी असताना दोन्ही संघ १९-१९ अशा बरोबरीत होते. सामन्याच्या अखेरची चढाई तेलगू टायटन्सची करो या मरोची चढाई होती. यादरम्यान उत्तर प्रदेशचा बचावपटू अंतिम रेषेच्या बाहेर गेल्यामुळे तेलगू टायटन्सला गुण बहाल करण्यात आला.

तेलगू टायटन्स यंदाच्या हंगामात आपल्या पहिल्या विजयाची चव चाखणार असं वाटत असतानाच, संघातल्या खेळाडूंनी सेलिब्रेशन करण्यासाठी दाखवलेला आनंद त्यांना चांगलाच नडला. पंचांनी सामना संपायची शिट्टी वाजवण्याच्या आधीच तेलगू टायटन्सचे खेळाडू मैदानात येऊन सेलिब्रेट करायला लागले. त्यामुळे पंचांनी उत्तर प्रदेशच्या संघाला टेक्निकल गुण बहाल करत सामना बरोबरीत सुटल्याची घोषणा केली. तेलगू टायटन्सच्या खेळाडूंनी पंचांच्या या निर्णयाविरोधात दाद मागितली, मात्र तिसऱ्या पंचांनीही पंचांचा निर्णय कायम ठेवल्यामुळे हा सामना २०-२० अशा बरोबरीत सोडवण्यात आला.