भारतीय संघामागे लागलेलं फलंदाजीच्या क्रमाचं संकट अजुनही कायम आहे. टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाची कामगिरी फारशी वाखणण्याजोगी नाही. आयसीसीच्या टी-२० जागतिक क्रमवारीत भारत पाचव्या स्थानावर आहे. बांगलादेशविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय संघाची उडालेली दाणादाण सर्वांनी अनुभवली आहे. शिखर धवनने पहिल्या सामन्यात एकाकी झुंज दिली खरी, मात्र यासाठी त्याने बरेच चेंडू वाया घालवले. याच कारणासाठी भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी पुढील दोन सामन्यांत शिखरने चांगला खेळ केला नाही, तर त्याच्या संघातील जागेबद्दल प्रश्न विचाराले जातील असं वक्तव्य केलं होतं.

गावसकरांच्याच वक्तव्याची री ओढत माजी भारतीय खेळाडू कृष्णमचारी श्रीकांत यांनी शिखर धवनला टी-२० संघातून वगळण्याची मागणी केली आहे. “भारतीय संघाला आज नाहीतर उद्या टी-२० संघासाठी स्थिर सलामीची जोडी शोधावी लागणार आहे. खेळाडूवर येणारा ताण हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. भारत पॉवरप्ले च्या षटकांचा फायदा उचलण्यात कमी पडतो हा इतिहास आहे. रोहित शर्मा अनेकदा चांगली सुरुवात करतो, मात्र शिखर धवन बऱ्याचदा गरजेच्या वेळेला धावा जमावण्यात अपयशी ठरतो. सध्या धवन ज्या पद्धतीने खेळतोय त्याचं मला आश्चर्य वाटतं. अनुभवी खेळाडू असूनही तो त्याच्या शैलीप्रमाणे पुढे येऊन फटके खेळत नाहीये, याचा संघाला फटका बसतोय. माझ्या मते शिखरला टी-२० संघातून वगळत लोकेश राहुलला रोहितसोबत सलामीला पाठवायला हवं.”

दिल्लीत बांगलादेशकडून भारताला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र या पराभवामुळे खचून जाण्याची गरज नसल्याचंही श्रीकांत यांनी स्पष्ट केलं. आगामी टी-२० विश्वचषक लक्षात घेता संघात बदल होणं गरजेचं आहे. टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रातील कॉलममध्ये श्रीकांत यांनी आपलं मत मांडलं आहे.

अवश्य वाचा –  टीम इंडियाच्या ‘गब्बर’ला सुनील गावसकरांचा गंभीर इशारा, म्हणाले…