अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक पी. टी. उषा यांना विश्वास

टिंटू लुका, ललिता बाबर आणि सुधा सिंग आगामी ऑलिम्पिकमध्ये अ‍ॅथलेटिक्समधील पदकांचा दुष्काळ संपवतील, असे मत माजी ऑलिम्पिकपटू व अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक पी. टी. उषा यांनी व्यक्त केले.

‘‘अ‍ॅथलेटिक्समध्ये पदक मिळवण्याबरोबरच स्पर्धेतील सहभागही महत्त्वाचा आहे. टिंटू, ललिता व सुधा यांच्याकडे अंतिम फेरीत स्थान मिळवण्याची क्षमता आहे. थोडेसे जास्त प्रयत्न या खेळाडूंनी केले तर भारताला अ‍ॅथलेटिक्समधील पदक मिळवता येईल,’’ असे उषा यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या, ‘‘पुरुष व महिलांच्या चार बाय ४०० मीटर रिले संघाकडूनही मला अव्वल यशाची कामगिरी अपेक्षित आहे. या संघातील खेळाडूंनी गेली दोन वर्षे सातत्यपूर्ण यश मिळवले आहे.’’

‘‘तिहेरी उडीत रंजित महेश्वरीने नुकतीच ऑलिम्पिक पात्रता पूर्ण केली आहे. तो अतिशय नैपुण्यवान खेळाडू आहे. त्याने आणखी थोडीशी मेहनत घेतली तर पदकाचे स्वप्न साकार करू शकेल. १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत द्युती चंदने अपेक्षा उंचावल्या आहेत. ११.२६ सेकंद अशी सर्वोत्तम कामगिरी आहे. जर तिने हे अंतर ११.२१ सेकंदात पार केले तर ती अंतिम फेरीत स्थान मिळवू शकेल. तिने या शर्यतीत ऑलिम्पिक पात्रता पूर्ण केली, हीच मोठी कामगिरी आहे,’’ असे उषा यांनी सांगितले.

द्युतीला केलेल्या मार्गदर्शनाबाबत उषा म्हणाली, ‘‘मी यापूर्वी तिच्याशी चर्चा केली आहे. ती खूप अबोल खेळाडू आहे. युरोपियन दौऱ्यातील स्पर्धासाठी रवाना होण्यापूर्वी ती मला भेटली होती. त्या वेळी मी तिला जिद्दीने ऑलिम्पिक पात्रता निकष करण्याचा सल्ला दिला होता. तसेच त्यासाठी तिने गांभीर्याने सराव करावा असेही मी तिला सुचविले होते. यंदा भारताचे भरपूर धावपटू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. त्यांनी स्वत:च्या कामगिरीत लक्षणीय प्रगती करावी अशी माझी इच्छा आहे.’’

 

*********************************

 

भारतीय खेळाडू उत्तेजक चाचणीत निदरेष -अगरवाल

पीटीआय, नवी दिल्ली

रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व भारतीय खेळाडूंची उत्तेजक चाचणी घेण्यात आली असून हे सर्व खेळाडू निदरेष आहेत, असे राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीचे सरसंचालक नवीन अगरवाल यांनी सांगितले.

‘‘आम्ही खेळाडूंची चाचणी घेतली, त्या वेळी काही खेळाडूंचा ठावठिकाणा लागत नव्हता. मात्र आम्ही त्यांची नव्याने चाचणी घेतली आहे. काही खेळाडू परदेशात सरावासाठी गेले असल्यामुळे त्यांची दोन वेळा चाचणी घेता आली नाही. मात्र आम्ही एकदा या खेळाडूंची चाचणी घेतली आहे. जे परदेशात आहेत, अशा खेळाडूंचे नमुने आणण्यासाठी काही संस्थांची मदत घेतली जात आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताचा एकही खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी आढळणार नाही,’’ असे अगरवाल यांनी सांगितले.