आगामी खडतर हंगामासाठी आपण तयार असल्याचे रनमशीन चेतेश्वर पुजाराने वेस्ट इंडिज अविरुद्धच्या त्रिशतकी अभिषेकासह सिद्ध केले. पुजाराच्या त्रिशतकाच्या जोरावरच भारतीय अ संघाने तिसऱ्या अनधिकृत कसोटीवर मजबूत पकड मिळवली आहे.
३ बाद ३३४ वरून पुढे खेळणाऱ्या भारतीय अ संघाने शुक्रवारी २३० धावांची भर घातली. यात मुख्य वाटा होता तो चेतेश्वर पुजाराचा. तंत्रशुद्ध फटके, संयम, एकेरी-दुहेरी धावांना दिलेली चौकारांची सुरेख साथ अशा गुणांसह पुजाराने ४१५ चेंडूत ३३ चौकारांसह नाबाद ३०६ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. प्रथम श्रेणी सामन्यातले पुजाराचे हे दुसरे त्रिशतक आहे. पुजाराने एकीकडे धावांची टांकसाळ उघडलेली असताना बाकी फलंदाजांना मात्र खेळपट्टीवर स्थिरावण्यात अपयश आले. पुजाराला रोखण्यासाठी वेस्ट इंडिजचा कर्णधार कीरेन पॉवेलने तब्बल आठ गोलंदाजांचा वापर केला. मात्र चिवट खेळासाठी प्रसिद्ध पुजाराने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना निष्प्रभ ठरवले. भारतीय संघाने आपला डाव ९ बाद ५६४ धावांवर घोषित केला. भारतीय संघाला २९६ धावांची भक्कम आघाडी मिळाली. वेस्ट इंडिजतर्फे अ‍ॅशले नर्सने सर्वाधिक ३ बळी टिपले.
तिसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात ३ बाद ११६ अशी मजल मारली आहे. नरसिंग देवनरिन ४४ तर असाद फुद्दादिन ३६ धावांवर खेळत आहे. वेस्ट इंडिजचा संघ अजूनही १८० धावांनी पिछाडीवर आहे.