चुरशीने झालेल्या लढतीत पुणे अ‍ॅटॅकर्सने जळगाव बॅटलर्सवर ३.५-२.५ अशी मात करीत पहिल्या महाराष्ट्र बुद्धिबळ प्रीमिअर लीग स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविले. पुणे-महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने पीवायसी हिंदू जिमखाना येथे या स्पर्धेचे आयोजन केले होते.
पुणे संघाकडून ग्रँडमास्टर एम. ललितबाबू याने महिला ग्रँडमास्टर मीनाक्षी सुब्बारामन हिच्यावर मात करत १-० अशी आघाडी मिळवून दिली. पाठोपाठ पद्मिनी राऊत हिने समीर कठमाळे याच्यावर विजय मिळवित २-० असे अधिक्य केले. महिला ग्रँडमास्टर स्वाती घाटे हिने पुण्याचे प्रतिनिधित्व करताना सुनीलदत्त नारायणन याच्याविरुद्ध बरोबरी स्वीकारली. त्यावेळी पुण्याची जळगावविरुद्ध २.५-०.५ अशी आघाडी होती. उदयोन्मुख ग्रँडमास्टर विदित गुजराथीने पुण्याच्या हिमांशू शर्माला पराभूत करीत जळगावला पहिला विजय मिळवून दिला. पुण्याचा नवोदित ग्रँडमास्टर अक्षयराज कोरेने जळगावच्या श्रीनाथ नारायणला बरोबरीत रोखले आणि पुण्याला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. त्यामुळे अमरदीप बारटक्के (पुणे) व ईशा करवडे (जळगाव) यांच्यातील लढतीविषयी उत्कंठा निर्माण झाली. विजय मिळविणे अशक्य असल्याचे लक्षात आल्यानंतर करवडे हिने बरोबरी मान्य करत पुण्याच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत अहमदनगर चेकर्स संघाने नागपूर रॉयल्सवर ५-१ असा एकतर्फी विजय मिळविला.