जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दोन पदके नावावर असणाऱ्या पी.व्ही. सिंधूने बेसेल येथे सुरू असलेल्या स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजयी आगेकूच केली. अन्य लढतीत बी. साईप्रणीत आणि समीर वर्मा या खेळाडूंना पराभवाला सामोरे जावे लागले.
दुखापती आणि सातत्याचा अभाव यामुळे सिंधूच्या कामगिरीत घसरण झाली आहे. ऑल इंग्लंड स्पर्धेत तर तिला सलामीच्या लढतीतच गाशा गुंडाळावा लागला. मात्र या स्पर्धेत जिद्दीने खेळ करणाऱ्या सहाव्या मानांकित सिंधूने तैपेईच्या पाइ यू पो हिच्यावर २१-१९, २१-६ अशी मात केली. पुरुष गटात थायलंडच्या ताओंगसक सेइनसोमबुनसुकने समीर वर्मावर २१-१५, २१-१९ अशी मात केली. जागतिक क्रमवारीत द्वितीय स्थानी असणाऱ्या चोयू तिआन चेनने साईप्रणीतला २१-१९, २१-६ असे नमवले. काही दिवसांपूर्वीच झालेल्या ऑल इंग्लंड स्पर्धेत साईप्रणीतने बलाढय़ ली चोंग वेईला चीतपट करण्याची किमया केली होती. या विजयामुळे साईप्रणीतकडून अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र या स्पर्धेत त्याला उपउपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.

सायनाची क्रमवारीत घसरण
* भारताची फुलराणी सायना नेहवालची जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी घसरण झाली आहे. प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतील पराभवामुळे सायनाच्या क्रमवारीतील स्थानावर परिणाम झाला आहे.
* पी.व्ही. सिंधूने एका स्थानाने सुधारणा करत ११वे स्थान गाठले आहे. पुरुष गटात किदम्बी श्रीकांत १०व्या तर पारुपल्ली कश्यप १७व्या स्थानी स्थिर आहे. एच. एस. प्रणॉयची घसरण होऊन तो २७व्या स्थानी आहे, तर बलाढय़ ली चोंग वेईला नमवणाऱ्या बी.साईप्रणीतने तीन स्थानांनी सुधारणा करत ३४वे स्थान पटकावले आहे.
* पुरुष दुहेरीत मनू अत्री आणि सुमीत रेड्डी जोडीने एका स्थानाने सुधारणा करत १९वे स्थानी आगेकूच केली आहे. ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडी १५व्या स्थानी आहे.