भारताचे आव्हान संपुष्टात

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदकविजेत्या पी.व्ही. सिंधूला डेन्मार्क बॅडमिंटन स्पर्धेत दुसऱ्याच फेरीत अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. सिंधूसह अजय जयराम आणि एच.एस.प्रणॉय हेही पराभूत झाल्याने स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले.

ऑलिम्पिक पदकामुळे सिंधूचे आयुष्यच पालटले. देशभरात सत्कार आणि बक्षीससोहळे तसेच जाहिराती, सदिच्छादूत, अनावरण कार्यक्रमांमुळे सिंधू काही स्पर्धामध्ये खेळूही शकली नाही. दररोज आयोजित कार्यक्रम आणि प्रवास यामुळे सिंधूच्या सरावावरही परिणाम झाला. डेन्मार्क स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वीच्या दोन दिवसांतही सिंधूचे व्यावसायिक कार्यक्रम सुरूच होते. दुसऱ्या फेरीच्या लढतीत जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी असणाऱ्या जपानच्या सयाका साटोने जागतिक क्रमवारीत आठव्या स्थावर असलेल्या सिंधूवर २१-१३, २१-२३, २१-१८ असा विजय मिळवला. साटोने पहिला गेम जिंकत आश्वासक सुरुवात केली. अटीतटीच्या दुसऱ्या गेममध्ये तडाखेबंद स्मॅशेस आणि नेटजवळून सुरेख खेळ करत बाजी मारली. तिसऱ्या गेममध्येही प्रत्येक गुणासाठी जोरदार मुकाबला रंगला. १८-१८ अशा बरोबरीतून साटोने चिवटपणे खेळ करत सरशी साधली.

गुडघ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे सायना या स्पर्धेत खेळू शकत नाही. सायनाच्या अनुपस्थितीत सिंधूवर भारताच्या आशा केंद्रित झाल्या होत्या. मात्र दुसऱ्याच फेरीत पराभवामुळे सिंधूला दमदार प्रदर्शनासाठी पॅरिस स्पर्धेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

चीनच्या शी युक्वीने अजय जयरामवर २३-२१, २१-१५ अशी मात केली. काही दिवसांपूर्वीच आटोपलेल्या नेदरलँड्स स्पर्धेत अजयने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. अंतिम लढतीतही त्याने जोरदार टक्कर दिली होती. त्या पराभवाची पुनरावृत्ती करण्यासाठी अजय आतूर होता. मात्र दुसऱ्याच फेरीत त्याला गाशा गुंडाळावा लागला.

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या मलेशियाच्या ली चोंग वेईने प्रणॉयला २१-१०, २२-२० असे नमवले. पहिल्या गेममध्ये वेईच्या झंझावातासमोर प्रणॉय निष्प्रभ ठरला. दुसऱ्या गेममध्ये प्रणॉयने कडवी टक्कर दिली. मात्र सारा अनुभव पणाला लावत लीने बाजी मारली.

 

चीन सुपरसीरिज स्पर्धेद्वारे सायना पुनरागमन करणार

हैदराबाद : भारताची फुलराणी सायना नेहवाल चीन स्पर्धेद्वारे पुनरागमन करणार आहे. दुखापतीमुळे सायनाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. याच दुखापतीमुळे सायनाला ऑलिम्पिक स्पर्धेत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. ऑलिम्पिकहून परतल्यानंतर सायनाच्या उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली. यामुळे तिला बऱ्याच स्पर्धामध्ये सहभागी होता आले नाही. मात्र आता सायना दुखापतीतून सावरली असून चीन स्पर्धेत खेळू शकते, असे तिचे वडील हरवीर सिंग यांनी सांगितले.  १२ नोव्हेंबरपासून ही स्पर्धा सुरू होत आहे. गेली दोन वर्षे सायनाने या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले होते.