रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक आणि नुकतेच चायना ओपनचे जेतेपद पटकावलेली भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू हिने हाँगकाँग ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. हाँगकाँग ओपनच्या दुसऱया फेरीत पी.व्ही.सिंधूने चीनच्या ह्सू या चिंग हिचा २१-१०, २१-१४ असा पराभव केला. सामन्यात सुरूवातीपासूनच सिंधूने वर्चस्व राखले होते. पहिल्या गेममध्ये सिंधूने ह्सू चिंग हिचा २१-१० असा धुव्वा उडवल्यानंतर दुसऱया गेममध्ये चिंग हिने पुनरागमनाचा प्रयत्न केला, पण त्यास अपयश आले. दुसरा गेम देखील सिंधूने २१-१४ असा जिंकून स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

पी.व्ही.सिंधू सध्या दमदार फॉर्ममध्ये असून तिने नुकतेच पहिल्यांदाच चायना ओपनचे जेतेपद पटकावले. चायना ओपनच्या अंतिम फेरीतील सामना चुरशीचा रंगला होता. सिंधूने चीनच्या सून यू हिचा २१-११, १७-२१ आणि २१-११ असा पराभव केला होता. पी.व्ही.सिंधूने पहिल्या गेममध्ये दमदार सुरूवात करत सून यू हिचा तब्बल २१-११ असा दारुण पराभव केला होता. त्यामुळे हा सामना एकतर्फी होणार असे चित्र असताना सून यू हिने दुसऱया गेममध्ये पुनरागमन केले. सून यू हिने दुसरा गेम १७-२१ असा जिंकल्याने सामना तिसऱया आणि निर्णायक गेमपर्यंत पोहोचला. सिंधूने तिसऱया गेममध्ये आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करून २१-११ असा जिंकला. सिंधूची ही कामगिरी ऐतिहासिक ठरली आहे. गेल्या ३० वर्षांमध्ये आजवर केवळ तीन चीन व्यतिरिक्त बॅडमिंटनपटूंनी ही स्पर्धा जिंकली होती. यात दोन भारतीय महिला बॅडमिंटनपटूंचा समावेश आहे. याआधी ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम सायना नेहवाल हिने केला होता.